मुंबईत अग्नितांडव! मोबाईल अन् प्लास्टिक गोदामाला भीषण आग, रात्री अनेकांची धावाधाव
मुंबईत रात्री अग्नितांडव पाहायला मिळालं. ग्रँडरोडमध्ये मोबाईल आणि प्लास्टिक गोदामाला भीषण आग लागली. आगीच्या घटनेमुळे रात्री अनेकांची धावाधाव झाली.

मुंबईत दोन दिवसांपूर्वी गोरेगाव मेट्रो स्टेशनच्या बेस्ट बसला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता ग्रँडरोड भागात आगीची दुर्घटना घडली आहे. ग्रँडरोड भागात शनिवारी (5 सप्टेंबर) रात्री भीषण आगीची घटना घडली. ग्रँडरोडमधील गोदामाला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचले.
आगीत अडकलेल्या नागरिकांची सुटका
मुंबईतील ग्रँड रोडमध्ये असलेल्या मोबाईल ॲक्सेसरीज आणि प्लास्टिक गोदामाला भीषण आग लागली. गोदामाला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. या आगीत अडकलेल्या 8 ते 10 जणांची सुटका करण्यात आली आहे. गोदामाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. ग्रँडरोड पूर्व येथील राजेंद्रसूरी आराधना भवन संचालित जिनशासन राजेंद्र चॅरिटेबल ट्रस्टमधील मोबाईल ॲक्सेसरीज आणि प्लस्टिक गोदामाला रात्री 11:30 वाजता शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली होती.
सात तासानंतर आगीवर मिळवलं नियंत्रण
गोदामाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला सात तासानंतर यश आलं. मात्र सात तासानंतर पुन्हा एकदा गोदामामध्ये असलेले फर्निचर धुमसत होते. त्याचा धूर आकाशाकडे जात होता. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानाने पाणी मारून पूर्णपणे आग विझविली. दोन मजली जुने बांधकाम होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर करण्यात आला होता. आगीमुळे सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या आगीत पूर्णपणे सामान जळून खाक झालं आहे.
गोरेगावमध्ये बेस्ट बसला आग
दोन दिवसांपूर्वी गोरेगावच्या मेट्रो स्टेशनखाली उभ्या असलेल्या बेस्ट बसला आग (Fire) लागल्याची घटना घडली. मेट्रो स्टेशनच्या खालीच ही दुर्घटना घडली. बसला अचानक आग लागल्याने परिसरात एकच धुराचे लोट निर्माण झाले. या आगीमुळे संपूर्ण मेट्रो स्टेशनमध्ये धुराचे लोट पसरले. या धुरामुळे प्रवाशांना श्वास घेण्यासही अडचणी येऊ लागल्या होत्या. धुरामुळे सर्व प्रवासी तातडीने मेट्रो स्टेशनच्या बाहेर आले. बसने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.