आम्ही प्रश्न विचारतच राहू, प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही?; शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

| Updated on: Jan 15, 2022 | 11:36 AM

गिरणी कामगारांपासून कोस्टल रोडपर्यंत मुंबईकरांना रोज प्रश्न पडत राहतात. आम्ही ते विचारत राहू. कारण प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.

आम्ही प्रश्न विचारतच राहू, प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही?; शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार
Follow us on

मुंबई: प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानावर पलटवार केला आहे. गिरणी कामगारांपासून कोस्टल रोडपर्यंत मुंबईकरांना रोज प्रश्न पडत राहतात. आम्ही ते विचारत राहू. कारण प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही?, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.

आशिष शेलार यांनी सलग चार ट्विट करून मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार करत टोला लगावला आहे. गारगाई धरणाच्या खर्चाच्या कितीतरी पट जास्त खर्च करुन समुद्राचे पाणी गोडे करण्याचा हट्टाहास का? गेल्या 24 वर्षात 21 हजार कोटी खर्च करुनही मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे का? 114% नालेसफाई करुनही मुंबईत पाणी का तुंबते? मुंबई पालिका वर्षाला साडेचार हजार कोटी आणि पाच वर्षात 22 हजार 500 कोटी खर्च करुनही पालिकेच्या रुग्णालयात उंदराने डोळे कुरतडून रुग्ण मरतोच कसा? वरळीच्या सिलेंडर स्फोटातील रुग्णांचा मृत्यू का झाले? मृतदेहा शेजारीच कोरोना रुग्णांना उपचार का दिले? परीक्षा रद्द करणारेच विद्यापीठात पदवीदान समारंभाला पाहुणे कसे? ज्यांनी प्रकल्पांना विरोध केला तेच आज प्रकल्पांचे श्रेय घ्यायला आणि नावं द्यायला पुढे पुढे कसे?,असा सवाल शेलार यांनी केला आहे.

कोस्टलमध्ये भ्रष्टाचाराचा तवंग कसा?

मुंबईत गेल्या 11 वर्षात 40 हजार झाडांची बिल्डरांसाठी कत्तल केली, मग मुंबईकरांची मेट्रो कारशेडच का अडवून ठेवली? कोस्टलरोडच्या कामात 1600 कोटींच्या भ्रष्टाचाराचा तवंग कसा? मुंबईतील आरक्षणे बदलून भूखंडांचे श्रीखंड कुणी खाल्ले? मुंबईतील गिरणी कामगार कुठे गेले? असे बरेच प्रश्न मुंबईकरांना रोज पडतात, आम्ही ते विचारत राहू! कारण… प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही?, असा टोला शेलार यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पालिकेच्या कार्यक्रमात विरोधकांवर टीका केली होती. कोरोनाच्या संकटात मुंबई महापालिकेने प्रचंड काम केलं. त्याचं कुणी घरच्यांनी आपलं कौतुक केलं नाही. थेट न्यूयॉर्कने आणि सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केलं. कौतुक करण्यासाठी आपण काम करत नाही. कर्तव्य म्हणून आपण काम करत असतो. कौतुक किती होईल याची मला चिंता नाही. दुषणं देणारे अनेक आहे. आताच्या कार्यक्रमाची किती मोठी बातमी येईल हे माहीत नाही. उद्या कौतुक किती होईल त्याची अपेक्षा नाही. पण जरा कुठे खुट्टं झालं तर महापालिकेवर खापर फोडलं जातं. नगरसेवक काय करतात? महापौर काय करतात? अशी दुषणं दिली जातात. आयुक्त काय करतात… हे काय करतात?… ते काय करतात..? हे सगळं ठिक आहे. पण तू काय करतो हे सांग? स्वत: काही करायचं नाही अन् प्रश्न विचारले जातात. प्रश्न विचारणं सोपं असतं, त्याला काही अकलेची गरज लागत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला होता.

 

संबंधित बातम्या:

काँग्रेसचा यूपीचा प्रयोग महाराष्ट्रातही, प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीत एक महिला कार्याध्यक्ष नियुक्त करणार!

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधवांविरोधात भाजपचा अविश्वास प्रस्ताव; मुंबई महापालिकेचं राजकारण तापलं

विरोधात बोलले म्हणून कामावरून काढणे योग्य नाही, किरण माने प्रकरणावरून उदय सामंत यांचा संताप; काय म्हणाले सामंत?