विरोधात बोलले म्हणून कामावरून काढणे योग्य नाही, किरण माने प्रकरणावरून उदय सामंत यांचा संताप; काय म्हणाले सामंत?

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेतील अभिनेते किरण माने (Actor Kiran Mane) यांना मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे. ते केंद्र सरकारच्या विरोधात बोलले म्हणून त्यांना काढल्याचा आरोप होत आहे. आता यावर मंत्री उदय सामंत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

विरोधात बोलले म्हणून कामावरून काढणे योग्य नाही, किरण माने प्रकरणावरून उदय सामंत यांचा संताप; काय म्हणाले सामंत?
उदय सामंत

मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील अभिनेते किरण माने (Actor Kiran Mane) यांच्याबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. किरण माने हे आपल्या सोशल मीडियावरील परखड मतप्रदर्शनामुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, आता त्यांना राजकीय भाष्य नडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यावरून आता उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केंद्र सरकारवर (Central Government) निशाणा साधला आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, केंद्र सरकारच्या विरोधात मत असू दे किंवा राज्य सरकारच्या विरोधात असू दे, हा त्या व्यक्तीचा अधिकार असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे. तसेच केंद्र सरकारविरोधात बोलले म्हणून त्यांना कामावरून काढून टाकणे योग्य नसल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली. पुढे बोलताना सामंत म्हणाले की, मी त्यांच्या अनेक पोस्ट पाहिल्या आहेत. त्यांनी एसटी संपावर देखील आपले मत मांडले होते. त्यांनी केलेल्या सूचना जर चांगल्या असतील तर त्यावर अंमलबजावणी व्हायला पाहिजे, ते केवळ केंद्र सरकारविरोधात बोलले म्हणून त्यांना कामावरून काढणे कितपत योग्य आहे, असा सवालही यावेळी सामंत यांनी उपस्थित केला आहे.

विरोधकांना जे जमले नाही ते उद्धव ठाकरेंनी केले

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नामकरणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विविध शिवप्रेमी संघटना आणि सामजिक संघटनांकडून बंगल्यांची नावे बदलण्यात यावीत अशी मागणी करण्यात येत होती. मीही याबाबत मुख्यमंत्र्यांना बोललो होतो. अशोक चव्हाण यांनी देखील मागणी केली. अखेर योगायोग जुळून आला आणि बंगल्यांची नावे बदलण्यात आल्याचे ते म्हणाले. माझ्या बंगल्याला रत्नसिंधू हे नाव मिळाले, याचा मला आनंद आहे. विरोधकांचे टीका करण्याचे कामच आहे, त्यांना टीका करू द्या. जे त्यांंना जमले नाही, ते उद्धव ठाकरेंनी करून दाखवल्याचे सामंत यांनी म्हटले.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीवर बोलणे टाळले

पंतप्रधानांनी काल कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते, याबाबत सामंत यांना प्रश्न विचारला असता त्यावर बोलणे त्यांनी टाळले. मुख्यमंत्री बैठकीला का हजर नव्हते हे मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगीतले आहे. त्यामुळे मी त्यावर वेगळ काही बोलणे योग्य ठरणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना काळात केंद्राला जे काम अपेक्षीत आहे, तेच करत असल्याचे सामंत यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

अजितदादांवर विश्वास नसेल तर आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपद सोपवा, भाजपाच्या आमदाराची मागणी!

मुंबईतील कोळीवाडे, गावठाणातील घरांना सरसकट मालमत्ता कर माफ करा, शेलारांची स्वाक्षरी मोहीम

‘फडणवीस हे कुटुंबप्रमुख, दरेकर आणि मी संताजी, धनाजीची जोडी’, नाराजीच्या चर्चेनंतर प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI