कांदिवली स्थानकात विनातिकीट प्रवाशावरुन हंगामा, प्रवासी महिलेचे कपडे फाडल्याचा आरोप
विना तिकीट पकडल्यानंतर या प्रवासी महिलेने हंगामा केल्याचा दावा रेल्वेने केला आहे. या प्रकरणात नेमकी चुक कोणाची याचा उलगडा सीसीटीव्ही पाहिल्यानंतर होईल असे म्हटले जात आहे.

मुंबईतील कांदिवली रेल्वे स्थानकावर एका महिलेला विनातिकीट प्रवास करताना टीसीने पकडल्यानंतर प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांत मोठा हंगामा झाल्याची घटना घडली आहे. या महिला प्रवाशाने टीसीवर आपले कपडे फाडल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात रेल्वे कर्मचाऱ्यांनी या महिलेनेच स्वत:चे कपडे फाडल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात आता सीसीटीव्ही तपासून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे म्हटले जात असून आता स्थानकात शांततेचे वातावरण आहे.
रेल्वेचे प्रवासी आणि टीसींमध्ये वादाचे प्रसंग वारंवार घडत असतात. रेल्वेचे प्रवासी विनातिकीट प्रवास करत असताना रेल्वे टीसींना न जुमानता वाद घालण्यास सुरुवात करतात असा रेल्वे प्रशासनाचा दावा आहे. त्यामुळे असे वादाचे प्रसंग उद्भवतात असे म्हटले जात आहे. शुक्रवारी सायंकाळी एका महिला प्रवाशाला टीसीने तिकीट विचारले असताना तिच्याकडे कोणतेही तिकीट नव्हते असे रेल्वेने म्हटले आहे. त्यावेळी टीसी आणि महिला प्रवाशात वादाला सुरुवात झाली.या महिलेने या टीसींवर तिचे कपडे फाडल्याचा आरोप केला आहे. यामुळे कांदिवली रेल्वे स्थानकात मोठा गोंधळ उडाला. या प्रकरणात रेल्वे प्रशासनाने महिला आधी विनातिकीट पकडली गेली. त्यानंतर तिने हा हंगामा सुरु केल्याचा दावा केला.
पश्चिम रेल्वे प्रशासनाने अलिकडेच रेल्वेच्या टीटीईना वाहतूक पोलिसाच्या धर्तीवर विशेष बॉडी कॅमेरे असलेले गणवेश प्रायोगिक तत्वावर तयार केल्याची बातमी आली होती. रेल्वेत प्रवास करताना अनेकदा टीटीई आणि प्रवाशांचे वाद होत असतात. अनेकदा टीटीई अरेरावी करत प्रवाशांना मारहाण करतात. तर बरेचदा टीटीईना देखील मारहाण केली जाते. त्यामुळे टीटीईच्या युनिफॉर्मवर बॉडी कॅमेरे असल्यास घटनेच्या वेळी नेमके काय झाले याचा पुरावा मिळणार आहे. तसेच रेल्वे स्थानकात सर्वत्र सीसीटीव्हीचे जाळे असल्याने टीटीईची की प्रवासी दोन्ही पैकी नेमकी चूक कोणाची याचा उलगडा करणे फारसे अवघड नाही. रेल्वे टीसींनी देखील त्यांची भाषा सौम्य ठेवावी अशीही मागणी केली जाते.