मुंबईतील सर्वात मोठ्या केईएम रुग्णालयाचे नाव बदलणार, भाजपच्या निर्णयावर ठाकरे गट आक्रमक

मुंबईतील ऐतिहासिक केईएम (KEM) रुग्णालयाचे नाव बदलून 'कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय' करण्याच्या प्रस्तावावरून वाद निर्माण झाला आहे. ठाकरे गटाचा या निर्णयाला तीव्र विरोध असून आज शिवडी परिसरात मोठे आंदोलन होणार आहे.

मुंबईतील सर्वात मोठ्या केईएम रुग्णालयाचे नाव बदलणार, भाजपच्या निर्णयावर ठाकरे गट आक्रमक
Kem Hospital
| Updated on: Apr 27, 2026 | 11:05 AM

मुंबईच्या आरोग्यसेवेचा कणा असलेल्या परळ येथील किंग एडवर्ड स्मारक म्हणजेच केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या रुग्णालयाचे नामकरण कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय असे केले जाणार आहे. नुकतंच या रुग्णालयाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यामुळे आता मुंबईच्या राजकीय वर्तुळात नवा वाद पेटला आहे. शिवसेना ठाकरे गटाने या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. रुग्णालयाच्या नामकरण प्रस्तावामुळे रुग्णालयाचा ऐतिहासिक वारसा पुसण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप केला जात आहे.

प्रस्तावाला मंजुरी कधी मिळाली?

मिळालेल्या माहितीनुसार या नामांतराचा वाद गेल्या आठवड्यापासून सुरु आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रुग्णालयाचे नाव बदलण्याबाबतचे अधिकृत पत्र आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांना दिले होते. हे पत्र आरोग्य समितीच्या बैठकीत चर्चेसाठी ठेवण्यात आले. त्यावर सत्ताधारी बहुमताच्या जोरावर या पत्राला मंजुरी देण्यात आली. सध्या हा नामांतराचा ठराव पुढील तांत्रिक प्रक्रियेसाठी आणि अभिप्रायासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे.

ठाकरे गटाकडून आज आंदोलन

मात्र ठाकरे गटाने रुग्णालयाचे मूळ नाव बदलण्यास कडाडून विरोध केला आहे. आज २७ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास शिवडी विधानसभा क्षेत्राच्या वतीने केईएम रुग्णालयाच्या परिसरात निदर्शने करण्यात येणार आहेत. माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि आमदार अजय चौधरी हे या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. केईएम हे नाव केवळ मुंबईतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर वैद्यकीय संशोधनासाठी प्रसिद्ध आहे. राजकीय फायद्यासाठी अशा ऐतिहासिक संस्थांची नावे बदलणे चुकीचे आहे, अशी भूमिका ठाकरे गटाने मांडली आहे. हे नेते आज रुग्णालयाचे अधिष्ठाता (Dean) यांची भेट घेऊन प्रस्तावाचा तीव्र निषेध करणारे निवेदन सादर करणार आहेत.

केवळ राजकीय स्तरावरच नव्हे, तर वैद्यकीय क्षेत्रातूनही या निर्णयाला विरोध केला जात आहे. निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्ड (MARD) ने यापूर्वीच आपली नाराजी व्यक्त केली आहे. डॉक्टरांच्या मते, केईएम हे नाव एका ब्रँडसारखे असून जगभरातील संशोधन पत्रिकांमध्ये याच नावाची नोंद आहे. नाव बदलल्यास प्रशासकीय आणि शैक्षणिक अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

दरम्यान येत्या काळात हा मुद्दा अधिक तापण्याची शक्यता आहे. केईएम रुग्णालायाच्या नामकरणासाठी भाजपकडून एकलव्य यांच्या नावाने भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर ठाकरे गट मुंबईचा वारसा जपण्याच्या मुद्द्यावरून भाजपला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे.

Follow Us