विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणतात, ‘मी अरुण गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य’

| Updated on: Apr 17, 2024 | 6:59 PM

"विधानसभा अध्यक्ष आहे. माझे मला अधिकार माहिती आहेत. अखिल भारतीय सेनेची साथ कधीही सोडणार नाही. डॅडींप्रमाणेच अखिल भारतीय सेनेच्या कार्यकर्त्यांना माझ्याकडून प्रेम मिळेल. अखिल भारतीय सेनेच्या परिवारात एक सदस्य आलाय, असं समजा", असं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणतात, मी अरुण गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणतात, 'मी अरुण गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य'
Follow us on

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून महायुतीने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रचारसभा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी 14 एप्रिलला भायखळ्यातील हेरीटेज हॉटेलमध्ये घेतलेल्या प्रचारसभेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत राहुल नार्वेकर मोठं वक्तव्य करताना दिसत आहेत. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला संपूर्ण जग ओळखतं. अरुण गवळी याचा अखिल भारतीय सेना नावाचा राजकीय पक्ष आणि संघटना आहे. तसेच अरुण गवळीला डॅडी अशा नावाने ओळखलं जातं. राहुल नार्वेकर आपल्या भाषणात अरुण गवळी आणि अखिल भारतीय सेनेचा उल्लेख करताना दिसत आहेत. अखिल भारतीय सेनेच्या परिवारात एक नवीन सदस्य जोडला आहे. आपण अखिल भारतीय सेनेचे नवीन सदस्य आहोत, असं राहुल नार्वेकर संबंधित व्हायरल व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.

राहुल नार्वेकर नेमकं काय म्हणाले?

“विधानसभा अध्यक्ष आहे. माझे मला अधिकार माहिती आहेत. अखिल भारतीय सेनेची साथ कधीही सोडणार नाही. डॅडींप्रमाणेच अखिल भारतीय सेनेच्या कार्यकर्त्यांना माझ्याकडून प्रेम मिळेल. अखिल भारतीय सेनेच्या परिवारात एक सदस्य आलाय, असं समजा. या बहिणीला (गीता गवळी) भावाची साथ निव्वळ लोकसभेसाठी नाही. तर मुंबईची महापौर होईपर्यंत राहील”, असं आश्वासन राहुल नार्वेकर आपल्या भाषणातून देताना दिसत आहेत.

दक्षिण मुंबईची जागा शिवसेना की भाजप लढणार?

महायुतीकडून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी अधिकृत उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. या मतदारसंघात गेल्या 10 वर्षांपासून शिवसेनेचे अरविंद सावंत हे खासदार आहेत. पण सध्या परिस्थिती वेगळी आहे. कारण शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. अरविंद सावंत हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. त्यानंतर आता भाजप या जागेवर उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. राहुल नार्वेकर यांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा सुरु आहे. पण अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याआधीच त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.

दुसरीकडे शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मिलिंद देवरा हे सलग 10 वर्षे काँग्रेसमध्ये असताना दक्षिण मुंबईचे खासदार राहिले आहेत. तसेच त्यांचे वडीलही चार वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे मिलिंद देवरा यांच्यादेखील नावाची जोरदार चर्चा आहे. उमेदवारीचा अद्याप अधिकृत असा निर्णय झालेला नाही. पण त्याआधीच राहुल नार्वेकर यांनी प्रचार सुरु केलाय. ते आपल्या प्रचारात अरुण गवळी यांच्या समर्थकांना आपल्याकडे वळण्याचा प्रयत्न करत आहेत.