मुंबईत पुन्हा कॉन्सर्टमध्ये मृत्यूचं सावट! नाचता नाचता तरुणाचा मृत्यू, तर तरुणीनी…

गोरेगाव नेस्कोमधल्या कॉन्सर्टमध्ये ड्रग्समुळे दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतरही कॉन्सर्ट आयोजनात खंड नाही. आता वरळी येथे झालेल्या कॉन्सर्टमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

मुंबईत पुन्हा कॉन्सर्टमध्ये मृत्यूचं सावट! नाचता नाचता तरुणाचा मृत्यू, तर तरुणीनी...
DOM
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 07, 2026 | 9:44 AM

काही दिवसांपूर्वी गोरेगाव येथे झालेल्या कॉन्सर्टदरम्यान ड्रग्ज घेतल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे मुंबईत खळबळ माजली होती. त्यापाठोपाठ आता मुंबईतील एनएससीआय (NSCI) वरळी डोम येथे आयोजित एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टदरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच तरुणासोबत असलेल्या तरुणीची प्रकृती बिघडल्याने तिलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, वरळी डोम येथील या लाईव्ह म्युझिक कार्यक्रमाला हजारो प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, कार्यक्रमादरम्यान मयत तरुण आणि त्याच्यासोबत असलेल्या तरुणीने मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केले होते. मद्याचा अतिरेक आणि प्रचंड गर्दीमुळे होणारी घुसमट यामुळे दोघांनाही अस्वस्थ वाटू लागले. नाचत असताना अचानक तो तरुण खाली कोसळला. त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्यासोबत असलेल्या तरुणीलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलीस तपास आणि ड्रग्जचा संशय

तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे. मृत्यूचे अचूक कारण निश्चित करण्यासाठी वैद्यकीय अहवाल आणि घटनास्थळावरील इतर पुराव्यांची तपासणी केली जात आहे. विशेष म्हणजे, या घटनेत ड्रग्जच्या (अंमली पदार्थांच्या) सेवनाचा काही संबंध आहे का, याचाही पोलीस कसून तपास करत आहेत.

वरिष्ठांच्या दबावामुळे परवानगी?

या दुर्घटनेनंतर मुंबई पोलिसांच्या परवानगी देण्याच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच गोरेगाव येथील नेस्को (NESCO) मध्ये झालेल्या कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या अतिसेवनामुळे दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून ताडदेव पोलिसांनी वरळी डोम येथील या कार्यक्रमाला सुरुवातीला परवानगी नाकारली होती. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पातळीवरून आलेल्या सूचनांमुळे स्थानिक पोलिसांना या कार्यक्रमाला अधिकृत परवानगी द्यावी लागली.

Follow Us