Mumbai Corona Update : बीए-5 आणि बीए-2.75 व्हेरियंटचा राज्यभरात धोका वाढला, मुंबईतही रुग्णवाढ!

| Updated on: Jul 19, 2022 | 2:24 PM

व्हेरियंट बीए 5 आणि बीए 2.75 च्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून मुंबईत 23 रुग्ण आढळले आहेत.

Mumbai Corona Update : बीए-5 आणि बीए-2.75 व्हेरियंटचा राज्यभरात धोका वाढला, मुंबईतही रुग्णवाढ!
कोरोना
Image Credit source: pixabay.com
Follow us on

गेल्या तीन वर्षांपासून जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचे (Corona) संकट आता कुठे कमी होत आहे, असे वाटत होते. या विषाणूने संपूर्ण जगाला हैराण करत कडक लॉकडाऊन (Lockdown) लावयाचीही वेळ आणली होती. ही परिस्थिती आता पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा नवे संकट समोर उभे आहे. कोरोनाचे व्हेरियंट बीए 5 आणि बीए 2.75 च्या रुग्णसंख्येत मुंबईसह (Mumbai) राज्यभरात वाढ होताना दिसत आहे. राज्यभरात बीए-5 व्हेरियंटचे 26 रुग्ण तर बीए- 2.75 चे 13 रुग्ण आढळले आहेत. केवळ मुंबईतच या दोन्ही व्हेरियंटचे 23 रुग्ण सापडले असून महाराष्ट्रात नव्या व्हेरियंटचा (Variant) धोका वाढताना दिसत आहे. पावसाळ्यात नव्या व्हेरियंटने धुमाकूळ घालण्यास सुरूवात केल्याने चिंता वाढली आहे. या ऋतूत साथीचे आजार पसरण्याची शक्यता जास्त असते, त्यातच कोरोनाचा नवा व्हेरियंट आल्याने चिंतेत भर पडली आहे. गेल्या अडीच-तीन वर्षांत कोरोनाच्या तडाख्यामुळे अनेक जण उध्वस्त झाले. आता बऱ्याच जणांचे लसीकरण झाल्याने परिस्थिती पूर्वपदावर येत आहे, असे वाटत असतानाच नव्या व्हेरियंटमुळे धोका वाढला आहे. त्यामुळे बूस्टर डोस घेणेही गरजेचे बनले आहे.

पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि बी. जे. वैद्यकीय यांनी दिलेल्या अहवालानुसार, महाराष्ट्रात बीए-5 व्हेरियंटचे 26 रुग्ण आढळले आहेत. तर बीए-2.75 चे 13 रुग्ण आढळले. यापैकी 23 रुग्ण मुंबईत तर 13 रुग्ण पुणे येथील आहेत. तसेच ठाणे, बुलढाणा व लातूरमध्येही प्रत्येकी 1 रुग्ण सापडला. हे सर्व नमुने 29 जून ते 4 जुलै या कालावधीतील आहेत.

दरम्यान महाराष्ट्रात आत्तापर्यंत बीए-4 व बीए- 5 चे 158 रुग्ण सापडले आहेत. तसेच बीए-2.75 व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या 70वर पोहोचली आहे.

हे सुद्धा वाचा

कुठे सापडले किती रुग्ण ?

बीए-4 आणि बीए-5चे राज्यभरात 158 रुग्ण आहेत. त्यापैकी पुण्यात 91, मुंबईत 51, ठाणे 5, नागपूर व पालघरमध्ये प्रत्येकी 4 तर रायगडमध्ये 3 रुग्ण सापडले आहेत. दरम्यान बीए-2.75 व्हेरियंटच्या राज्यभरातील रुग्णांची संख्या आहे 70. त्यापैकी पुण्यात 43, नागपूरमध्ये 14, मुंबईत 5, अकोल्यात 4 तर ठाणे, यवतमाळ, लातूर व बुलढाण्यामध्ये प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे.

मुंबईत घटली कोरोना रुग्णांची संख्या

दरम्यान महाराष्ट्रासह मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तसेच राज्यात एकही मृत्यू झालेला नाही. राज्यात आज दिवसभरात 1,111 रुग्ण सापडले तर 1474 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहे. आज मुंबईत 167 रुग्ण सापडले तर 235 जण कोरोनातून मुक्त झाले.
राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 15,162 इतकी आहे .