चार वर्षापूर्वी जिम ट्रेनर, नंतर बाबा बनला, मध्यरात्री बोलवायचा, काळीज मागायचा अन्… मुंबईतला भोंदू बाबा महिलांना कसे अडकवायचा?

मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी उपचाराच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या, अघोरी पूजा करणाऱ्या आणि अंधश्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या रिदम पांचाळ या भोंदू बाबाला अटक केली आहे.

चार वर्षापूर्वी जिम ट्रेनर, नंतर बाबा बनला, मध्यरात्री बोलवायचा, काळीज मागायचा अन्... मुंबईतला भोंदू बाबा महिलांना कसे अडकवायचा?
mumbai Bhondu baba
| Updated on: Apr 16, 2026 | 11:51 AM

मुंबईच्या दिंडोशी परिसरातून एका धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. उपचारांच्या नावाखाली महिलांना मध्यरात्री बोलावून त्यांचे शोषण करणाऱ्या आणि भक्तांची लूट करणाऱ्या मुंबईतील एका भोंदू बाबाला अटक करण्यात आली आहे. रिदम पांचाळ उर्फ मॉन्टी पांचाळ (३७) असे या भोंदू बाबाचे नाव असून दिंडोशी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. भाजपचे माजी नगरसेवक ॲड. सिद्धार्थ शर्मा यांच्या सतर्कतेमुळे या बाबाचे बिंग फुटले आहे. आतापर्यंत ६० हून अधिक पीडितांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

जिम ट्रेनर ते भोंदू बाबा असा प्रवास

सिद्धार्थ शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिदम पांचालचे आयुष्य चार वर्षांपूर्वीपर्यंत एका सामान्य जिम ट्रेनरप्रमाणे होते. मात्र, झटपट पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी त्याने बाबा बनण्याचा मार्ग निवडला. लोकांच्या अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत त्याने मालाडमधील एका मोकळ्या मैदानात दर गुरुवारी आणि शनिवारी रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत दरबार भरवण्यास सुरुवात केली.

या बाबाचा दावा होता की, त्याच्यावर देवी अवतरते आणि तो कोणतेही आजार बरे करू शकतो. विशेषतः मूल न होणाऱ्या महिलांना तो गंडा घालत असे. त्याच्या उपचार पद्धती अत्यंत संशयास्पद होत्या. तो मध्यरात्री महिला आणि मुलींना बोलावून पूजेच्या नावाखाली अश्लील कृत्य करायचा. तसेच उपचार करण्याच्या मोबदल्यात तो भक्तांकडून मोठी रक्कम, महागडी दारू, सिगारेट, जिवंत कोंबडी आणि बोकडाचे काळीज यांची मागणी करत असे. त्यासोबतच भूतबाधेचे ढोंग करत तोंडात सिगारेट पेटवून तो भक्तांच्या अंगातील भूत उतरवण्याचे नाटक करायचा.

ॲड. सिद्धार्थ शर्मा यांचा हस्तक्षेप आणि कारवाई

जेव्हा या बाबाने तक्रारदारांच्या घरी गुंड पाठवून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा प्रकरण गंभीर झाले. भाजपचे नगरसेवक ॲड. सिद्धार्थ शर्मा यांनी पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी पोलिसांकडे धाव घेत बाबाच्या गुन्हेगारी कृत्यांचा पर्दाफाश केला. या बाबाला राजकीय वरदहस्त असल्याच्या चर्चा आहेत. पोलिसांनी याप्रकरणी ठोस पुरावे गोळा करून त्याला अटक केली आहे.

दरम्यान सद्यस्थितीत दिंडोशी पोलिसांनी बाबाच्या विरोधात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार असून त्याला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी ६० हून अधिक तक्रारदार समोर आल्यामुळे त्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे. येत्या काळात बाबावर आणखी नवीन गुन्हे दाखल होऊ शकतात, असे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.

Follow Us