गोरेगाव नेस्को सेंटर ड्रग्स पार्टीप्रकरणी मोठी अपडेट, त्या रात्री काय घडलं? A टू Z अपडेट समोर

गोरेगावच्या नेस्को सेंटरमधील म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्स ओव्हरडोजमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून मुख्य ड्रग्स पुरवठादाराचा शोध सुरू आहे.

गोरेगाव नेस्को सेंटर ड्रग्स पार्टीप्रकरणी मोठी अपडेट, त्या रात्री काय घडलं? A टू Z अपडेट समोर
Mumbai Drugs Party Goregaon 1
| Updated on: Apr 14, 2026 | 1:16 PM

गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका म्युझिक कॉन्सर्टदरम्यान झालेल्या ड्रग्स पार्टी प्रकरणाने खळबळ उडवून दिली आहे. या म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोजमुळे २ जणांचा मृत्यू झाला होता. तर काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणात पोलिसांनी वेगवान कारवाई करत मुंबईसह कल्याणमधून आतापर्यंत एकूण ६ आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या सर्व आरोपींना न्यायालयाने १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेने मुंबईतील हाय-प्रोफाईल पार्ट्यांमध्ये होणाऱ्या अमली पदार्थांच्या वापराबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

नेमकं काय घडलं?

शनिवारी ११ एप्रिलला नेस्को सेंटरच्या हॉल नंबर ५ मध्ये एका मोठ्या म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी २ हजार रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले होते. या कार्यक्रमाला जमनाबाई बजाज इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचा एक गट सहभागी झाला होता. सुमारे १५ ते १६ जणांचा हा गट ५ ते १० जणांच्या उप-गटांमध्ये आला होता.

यातील १० ते १२ विद्यार्थ्यांच्या या गटाने पार्टी सुरू असताना ‘एमडी’ (MD) आणि ‘एमए’ (MA) यासारख्या घातक अमली पदार्थांच्या गोळ्यांचे सेवन केले. नशेत धुंद असताना यातील तिघांनी नियमापेक्षा जास्त म्हणजे दोन दोन डोस घेतले. यामुळे त्यांना ओव्हरडोस झाला. यानंतर त्यांना तातडीने श्वसनाचा तीव्र त्रास सुरू झाला. या घटनेत शीतल नावाच्या विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर उपस्थित इतर विद्यार्थ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते.

हे आरोपी मुंबईबाहेरून ६ ते ७ गोळ्या (टॅबलेट्स) सोबत घेऊन आले होते. या प्रकरणातील मुख्य ड्रग्स विक्रेत्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोठी मोहीम राबवली. मुख्य सूत्रधार आनंद पटेल याच्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर खडकपाडा पोलिसांनी पहाटे ५.३० च्या सुमारास कल्याणातील वायले नगरमध्ये धडक दिली. आनंद पटेलने सुरुवातीला दरवाजा उघडण्यास नकार देऊन पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हुशारीने त्याला ताब्यात घेतले.

आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे

  1. विहान उर्फ आकाश सामल: या कार्यक्रमाचा मुख्य आयोजक
  2. सनी जैन: नेस्को सेंटरचा व्यवस्थापक
  3. बालकृष्ण कुरुप: नेस्को सेंटरचा मुख्य सुरक्षा व्यवस्थापक
  4. रौनक खंडेलवाल: ड्रग्स पुरवठादार
  5. आनंद पटेल: मुख्य ड्रग्स विक्रेता (कल्याण येथून अटकेत)
  6. प्रतीक पांडे: ड्रग्स विक्रेता.

ड्रग्स कुठून आणले?

पोलिसांनी आतापर्यंत घटनास्थळी उपस्थित असलेले आणि या प्रकरणाशी संबंधित १२ जणांचे सविस्तर जबाब नोंदवले आहेत. यातून ड्रग्सची खरेदी आणि पुरवठा साखळी स्पष्ट होत आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना न्यायालयाने १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच आणखी एका आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ६ ते ७ गोळ्या मुंबईबाहेरून आणल्या होत्या. हे ड्रग्स शहरात कसे आले आणि त्यामागे कोणती टोळी सक्रिय आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलीस या प्रकरणाचे कनेक्शन तपासात आहेत. तसेच सध्या पोलीस २०-२५ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या संपर्कात असलेल्या इतर ड्रग्स पेडलर्सचा शोध घेत आहेत. या प्रकरणातील आरोपींना झालेली अटक ही केवळ सुरुवात असून उच्चशिक्षित तरुणांना ड्रग्सच्या जाळ्यात ओढणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे.

Follow Us