अपघात रोखण्यासाठी महापालिकेचं एक पाऊल पुढे; मुंबईत साकारला पहिला ‘सेफ स्कूल झोन’

| Updated on: Oct 20, 2021 | 7:15 PM

मुंबईतील अपघात रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. महापालिकेतील मुंबईतील पहिला सेफ स्कूल झोन तयार केला आहे. (Mumbai gets its First Safe School Zone)

अपघात रोखण्यासाठी महापालिकेचं एक पाऊल पुढे; मुंबईत साकारला पहिला ‘सेफ स्कूल झोन’
Safe School Zone
Follow us on

मुंबई: मुंबईतील अपघात रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. महापालिकेतील मुंबईतील पहिला सेफ स्कूल झोन तयार केला आहे. भायखळा येथे प्रायोगिक तत्त्वावर हा सेल्फ स्कूल झोन तयार करण्यात आला आहे.

महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस यांनी वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (डब्ल्यूआरआय), इंडिया रॉस सेंटर यांच्या भागीदारीने भायखळा येथील मिर्झा गालिब मार्गावर शहरातील पहिला सेफ स्कूल झोन तत्वावर सुरू केला. हा प्रकल्प ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी यांच्यातर्फे हाती घेण्यात आला आहे. मुंबईत बालक-स्नेही आणि चालण्याजोगे स्कूल झोन तयार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. रस्ता वापरकर्त्यांसाठी, विशेषतः मुलांसाठी रस्ते चालण्याजोगे, विनाअडथळा, सुरक्षित आणि अधिक चैतन्यमय करणारी डिझाइन सोल्यूशन्स या प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पात राबविण्यात येणार आहेत.

सूचना, हरकती मागवणार

मुंबई वाहतूक पोलीस, बृहन्मुंबई महानगरपालिका, तज्ज्ञ आणि स्थानिक रहिवासी एकत्र आले आणि त्यांनी रंग, बॅरिकेड्स आणि कोन्सचा प्रायोगिक तत्त्वावर वापर केला. डिझाइन सोल्यूशनमध्ये माहितीफलकांचा वापर करून स्कूल झोन्सची आखणी करणे, रस्त्यांवर खुणा करणे, चालण्यासाठी व वाट पाहण्यासाठी निश्चित भाग नियुक्त करणे, पिक-अप झोन, ड्रॉप झोन यासह मल्टि-युटिलिटी (बहु-उपयुक्तता) झोन्स निश्चित करणे, खेळण्यासाठी बालकस्नेही घटकांचा अंतर्भाव करणे आणि पादचाऱ्यांसाठी ठळक क्रॉसिंग आखणे याचा समावेश आहे. कमी खर्चाच्या साहित्याचा वापर करून केलेल्या या प्रकल्पाविषयी या परिसरातील नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात येतील आणि त्यानंतरच हे बदल कायमस्वरुपी करण्यात येतील.

शाळेत जाण्याचा मार्ग सुरक्षित असावा

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आणि शाळेतील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतानाच, शाळेत जाण्याचा मार्गही सुरक्षित असावा, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. मुंबईत शाळा चालत जाण्याच्या अंतरावर असली तरी हे रस्ते चालण्याच्या दृष्टीने सुरक्षित नसल्याने अनेक पालक त्यांच्या वाहनांनी मुलांना शाळेत पोहोचवतात. मुलांसाठी रस्ते सुरक्षित केल्याने रस्ते वापरणाऱ्या सर्वांसाठीच ते सुरक्षित कसे होतील, हे या प्रयोगातून दिसून येईल, असं समाजवादी पार्टीचे स्थानिक नगरसेवक आणि आमदार रईस शेख यांनी सांगितलं.

तीन वर्षात 23 अपघात

ई वॉर्डमधील (भायखळा) मिर्झा गालिब मार्गावर ख्राइस्ट चर्च स्कूल आणि सेंट अॅग्नेस हाय स्कूल या दोन शाळा आहेत. 2017 ते 2019 या तीन वर्षांच्या काळात ख्राइस्ट चर्चच्या परिसरातील 500 मीटरच्या परिघात 23 अपघात झाले आणि 3 मृत्यू झाले आहेत. यात दोन मुलांचाही समावेश होता. घरी परत जाताना झालेल्या अपघातात त्यांना गंभीर इजा झाली होती आणि एका मुलाचा मृत्यू झाला होता. तसेच, 2017 ते 2019 या काळात मुंबईतील एकूण 2,610 शाळांपैकी 28% शाळांच्या 500 मीटरच्या परिघामध्ये तीनहून अधिक अपघाती मृत्यू झाले आहेत.

अनेक जीव वाचतील

शहरातील रहिवाशांची रहदारी आणि सुरक्षितता वाढविण्यात रस्त्यांची रचना कारसाठी न करता लोकांसाठी करण्याची महत्त्वाची भूमिका असते. बृहन्मुंबई महानगरपालिकेशी भागीदारी करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. कारण सर्वात असुरक्षित रस्तेवापरकर्त्यांसाठी म्हणजे मुलांसाठी सुरक्षित रस्ते व सुरक्षित रहदारीसाठी ते आपल्या प्रयत्नांची व्याप्ती वाढवत आहेत. सेफ स्कूल झोन उपक्रमामुळे अनेक जीव वाचतील आणि भारतातील इतर शहरांसाठी हे एक पथदर्शक प्रारुप असेल, असं ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपीजच्या केली लार्सन यांनी सांगितलं.

अनोखा प्रयोग

ख्राइस्ट चर्चच्या परिसरात या शाळेतील विद्यार्थ्यांना काय पाहायला आवडेल हे जाणून घेण्यासाठी ऑक्टोबर 2019 मध्ये डब्ल्यूआरआय इंडियाने या शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत एक कार्यशाळा आयोजित केली होती. यामध्ये, त्यांना काय आवडते/आवडत नाही हे जाणून घेण्यासाठी शाळेच्या परिसरात फेरी आयोजित करण्यात आली होती. त्याचप्रमाणे यात एक व्हिज्युअलायझेशनचा प्रयोगही समाविष्ट होता. या अंतर्गत मुलांना रस्त्यावर त्यांना आवडणारे घटक समाविष्ट करायचे होते. त्याचप्रमाणे प्रवासाचे कशा प्रकारे केला जातो, मुलांचा प्रवासात जाणारा वेळ आणि त्यांच्यासमोरील आव्हाने जाणून घेण्यासाठी डब्ल्यूआरआय इंडियाने भागधारकांशी सल्लामसत केली होती आणि सर्वेक्षण केले होते.

रस्ते मुलांसाठी सुरक्षित नाही

डब्ल्यूआरआय इंडियाच्या सस्टेनेबल सिटीज आणि ट्रान्सपोर्टचे व्यवस्थापक रोहित टाक म्हणाले की, “जवळपास 57% पालकांना आम्हाला सांगितले की, त्यांच्या मुलांच्या शाळेच्या परिसरातील रस्ते मुलांच्या दृष्टीने सुरक्षित नाहीत. यासाठी चांगल्या दर्जाचे पदपथ नसणे आणि वाहनांची गर्दी असणे हे घटक कारणीभूत आहेत.” ते पुढे म्हणाले, “मुलांची उंची, आकलनक्षमता आणि धोका ओळखण्याची क्षमता ही प्रौढांच्या तुलनेने कमी असल्यामुळे मुलांना जास्त धोका असतो. या आमच्या योजनेमध्ये बालकस्नेही, सुरक्षित रस्ता असेल जो त्यांचा शाळेत येण्या-जाण्याचा प्रवास आरामदायी व आनंददायी करेल.”

 

संबंधित बातम्या:

सत्ता आमची असली तरी सरकारशी दोन हात करू; क्लस्टरच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आक्रमक

अखेर राज्य महिला आयोगाला अध्यक्ष मिळाला! सरकारकडून रुपाली चाकणकर यांची नियुक्ती

VIDEO: दबाव झुगारून बेकायदा बांधकामे पाडा, मी तुमच्या पाठीशी आहे; मुख्यमंत्र्यांच्या पालिकेला कडक सूचना

(Mumbai gets its First Safe School Zone)