सत्ता आमची असली तरी सरकारशी दोन हात करू; क्लस्टरच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आक्रमक

एकीकडे भाजपने राज्यातील महाविकास आघाडी सरकारला विविध मुद्द्यावरून घेरले असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यानेही क्लस्टर योजनेवरून सरकारला घरचा आहेर दिला आहे. (ncp leader pramod hindurao warns maharashtra government over cluster development)

सत्ता आमची असली तरी सरकारशी दोन हात करू; क्लस्टरच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आक्रमक
pramod hindurao

कल्याण: एकीकडे भाजपने राज्यातील महाविकास आघाडी सरकारला विविध मुद्द्यावरून घेरले असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यानेही क्लस्टर योजनेवरून सरकारला घरचा आहेर दिला आहे. ‘सरकार आमचे असले तरी वेळ पडल्यास आम्ही समाजासाठी त्यांच्याविरोधात दोन हात करू’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी दिला आहे. त्यामुळे क्लस्टरच्या मुद्द्यावरून आघाडीत बिघाडी असल्याचं उघड झालं आहे.

कल्याणामध्ये येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध मंत्री आणि नेत्यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रे निमित्त 23, 24 आणि 25 ऑक्टोबरला कल्याण-डोंबिवलीत शहापूर मुरबाड या भागात येणार आहेत. त्याबाबत माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी प्रमोद हिंदुराव यांनी क्लस्टर योजनेवरून चक्क आपल्याच सरकारविरोधात दंड थोपटल्याचे दिसून आले. यावेळी हिंदुराव यांनी विविध मुद्द्यांवर आपली मते मांडली. मात्र क्लस्टर योजनेसंदर्भात बोलताना हिंदुराव यांनी थेट भूमिकाच स्पष्ट केली आहे.

हक्क कुणाकडे मागणार?

आमची क्लस्टरबाबतची भूमिका रास्त आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्वात जास्त अतिक्रमण या महानगर पालिकेच्या हद्दीत झालेलं आहे. 60 ते 65 हजार अतिक्रमण कल्याण डोंबिवलीत झालेले आहे. कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगरसह बाकीच्या महानगर पालिका, नगरपरिषदेत क्लस्टर योजना आली तर सर्वसामान्य नागरिकांना कमी दरामध्ये घरे उलब्ध होतील. हक्क मिळण्यासाठी मागायला काही हरकत नाही. राज्य सरकारकडे मागणार नाही तर कोणाकडे मागणार? असा सवाल करतानाच सरकार कोणाचेही असो समाजासाठी काम करायचं असेल तर माझ्या पक्षाचं सरकार जरी असलं तरी समाजासाठी आम्ही दोन हात करण्याची तयारी ठेवणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीत गटबाजी?

दरम्यान, या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीतील गटबाजीची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी रेखा सोनवणे, प्रसाद महाजन आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

 

संबंधित बातम्या:

VIDEO: दबाव झुगारून बेकायदा बांधकामे पाडा, मी तुमच्या पाठीशी आहे; मुख्यमंत्र्यांच्या पालिकेला कडक सूचना

आता हवं तिथं घर घ्या, पर्यायी घर नको असल्यास थेट 50 लाख रुपये मिळणार: मुंबई महापालिकेची आयडियाची कल्पना

Aryan Khan : आर्यन खानची मुंबई हायकोर्टात धाव, विशेष NDPS कोर्टाच्या निर्णयाला आव्हान, दिलासा मिळणार?

(ncp leader pramod hindurao warns maharashtra government over cluster development)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI