गोरेगावच्या नेस्को कॉन्सर्टमध्ये नक्की काय घडले? दोघांच्या मृत्यूनंतर व्यवस्थापनाचे धक्कादायक स्पष्टीकरण
मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये म्युझिक कॉन्सर्टदरम्यान ड्रग्जच्या अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर नेस्को व्यवस्थापनाने आपली भूमिका स्पष्ट केली असून पोलीस तपास सुरू आहे.

मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित एका म्युझिक कॉन्सर्टदरम्यान अमली पदार्थांच्या (ड्रग्स) अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील गंभीरतेची दखल घेत नेस्को व्यवस्थापनाने अखेर अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात व्यवस्थापनाने घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यासोबतच आपल्यावरील निष्काळजीपणाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
नेमकी घटना काय?
गेल्या शनिवारी (११ एप्रिल) नेस्को सेंटरमध्ये नाईन टाईम्स नाईन या लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडली. प्राथमिक तपासात अमली पदार्थांच्या ओव्हर डोसमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर एक जण आयसीयूमध्ये उपचार घेत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी वनराई पोलिसांनी आतापर्यंत काही जणांना अटक केली असून सखोल तपास सुरू आहे.
नेस्को व्यवस्थापनाचे म्हणणे काय?
या घटनेनंतर नेस्को व्यवस्थापनाने एक निवदेन जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल तीव्र शोक संवेदना व्यक्त करतानाच सध्या उपचार घेत असलेल्या व्यक्तींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आवश्यक असलेले सर्व सरकारी नियम, कायदे आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे आम्ही काटेकोरपणे पालन केले होते, असा दावा नेस्कोने केला आहे.
या कार्यक्रमाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात होती आणि सुरक्षाविषयक सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या. अमली पदार्थांच्या वापराविरुद्ध आमचे झिरो टॉलरन्स धोरण आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांवरही नियमांचे पालन करण्याची जबाबदारी आहे, असे व्यवस्थापनाने नमूद केले आहे. सध्या सुरू असलेल्या पोलीस तपासात नेस्को पूर्ण सहकार्य करत आहे. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. नेस्को किंवा आमच्या कर्मचाऱ्यांकडून या प्रकरणात कोणतीही निष्काळजीपणा झालेली नाही, असे ठाम मत व्यवस्थापनाने व्यक्त केले.
तर दुसरीकडे, या प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत नेस्कोच्या मालकांवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे. तसेच, कॉन्सर्टमध्ये नो कॅमेरा पॉलिसी का राबवण्यात आली होती, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, ड्रग्जचा पुरवठा कोठून झाला आणि यामागे कोणाचे रॅकेट आहे, याचा शोध घेतला जात आहे. या संपूर्ण प्रकरणातील निष्कर्षांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.