लहानपणीच्या आठवणींना उजाळा, मुंबई आता झोपडपट्टीमुक्त करणार, पीयूष गोयल यांचा मास्टरप्लॅन

| Updated on: Mar 29, 2024 | 6:27 PM

"लहानपणी शाळेत जायचो तेव्हा सायनहून रेल्वे पकडायचो. दादरला यायचो. त्यानंतर पश्चिम रेल्वे मार्गाने चर्चगेटला कॉलेजला जायचो. कधी डोंबिवली जायचो. त्यानंतर हार्बल लाईनने नवी मुंबई जायचो. एवढे सर्व जुने मित्र, ज्यांच्यासोबत लहानपणापासून काम केलं त्यांची भेट झाली", असं पीयूष गोयल म्हणाले.

लहानपणीच्या आठवणींना उजाळा, मुंबई आता झोपडपट्टीमुक्त करणार, पीयूष गोयल यांचा मास्टरप्लॅन
भाजप नेते पीयूष गोयल
Follow us on

भाजप नेते पीयूष गोयल यांना पक्षाकडून उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. पीयूष गोयल पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत आहेत. या निमित्ताने पीयूष गोयल यांच्या मनात त्यांच्या मतदारसंघात विकासाचा नेमका काय संकल्प आहे, त्यांना काय-काय सुविधा नागरिकांना द्यायच्या आहेत, मतदारसंघातील नागरिकांचं जीवन सुखकर करण्यासाठी काय-काय नियोजन केलं आहे, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. पीयूष गोयल यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. “आम्हाला जनतेची कामे करायची आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची दिशा बदलली. मला जनतेसमोर जाण्याची संधी पहिल्यांदा मिळत आहे. मी वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. होळी साजरी केली. चांगला विजय होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय होईल”, अशी प्रतिक्रिया पीयूष गोयल यांनी दिली.

“पक्ष जिथे पाठवणार तिथे आम्ही प्रचारासाठी जाऊ. पण स्वत:च्या मतदारसंघात जाण्याचा आनंदच काही वेगळा होता. माझ्या नावाची घोषणा झाल्यानंतर खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासोबत आमची बातचित झाली. ते म्हणाले, या. तुमचं आम्ही बोरीवलीत भव्य स्वागत करु इच्छितो. पुढच्या दिवशी आलो आणि खूप चांगलं वाटलं. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लहानपणी शाळेत जायचो तेव्हा सायनहून रेल्वे पकडायचो. दादरला यायचो. त्यानंतर पश्चिम रेल्वे मार्गाने चर्चगेटला कॉलेजला जायचो. कधी डोंबिवली जायचो. त्यानंतर हार्बल लाईनने नवी मुंबई जायचो. एवढे सर्व जुने मित्र, ज्यांच्यासोबत लहानपणापासून काम केलं त्यांची भेट झाली”, असं पीयूष गोयल यांनी सांगितलं.

‘इतक्या लोकांना जिंकून आणल्यानंतर मी आता स्वत: उमेदवार’

“आता 40 वर्ष झाले. एवढ्या वर्षात, एवढ्या निवडणुकांमध्ये काम केल्यानंतर, इतक्या सर्व जणांना जिंकून आणल्यानंतर मी आता स्वत: उमेदवार आहे. हा नवा अनुभव आहे. लोकसभा निवडणूक देशाला नव्या उंचीवर पोहोचवणार आहे. मोदींनी भारताच्या विकासाना नवं वळणं दिलं. मोदींनी सुशासनाकडे लक्ष दिलं. येत्या काळात भारताला आणखी चांगली दिशा द्यायची याबाबत आमचं काम करु”, असं पीयूष गोयल यांनी सांगितलं.

‘उत्तर मुंबईला झोपडीमुक्त करु’

“माझं संपूर्ण मुंबई हे कार्यक्षेत्र राहिलं आहे. पण उत्तर मुंबईत जेव्हा मी गेलो तेव्हा काही गोष्टी निदर्शनास आली, मी सायनला राहायचो तेव्हा धारावी आमच्या जवळच होतं. माझ्या मनात नेहमी इच्छा असायची की, मुंबईला झोपडीमुक्त कसं करायचं? मी निर्णय घेतलाय की, उत्तर मुंबईला एक प्रयोगशाळेच्या रुपाने बघायचं. उत्तर मुंबईला झोपडीमुक्त कसं करता येईल? यासाठी प्रयत्न करु. मोदी म्हणतात, लाखो समस्या येतील, पण त्यापुढे कोट्यवधी समाधान मिळतील. झोपडीमुक्त मुंबईच्या रुपाने आम्ही प्रयोग करु. मुलांना सर्व सुख सुविधा मिळाव्यात. येणाऱ्या पिढ्यांना चांगलं जीवन देता येईल, असं मुंबईला बनवायचं आहे”, अशी प्रतिक्रिया पीयूष गोयल यांनी दिली.

‘मेडिकल कॉलेज सुरु करणार’

“एक आणखी विषय माझ्या मनात सुरु आहे, मी त्यावर काम करणार आहे. उत्तर मुंबईत आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल नाहीय. कुणी जास्त आजारी पडलं तर दूर जावं लागतं. त्यामुळे तिथे एक असं रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज बनवावं जिथे प्रत्येक आजारावर उपचार होऊ शकेल. माझी इच्छा आहे की, गोरेगाव हार्बल लाईनला पुढे करायचं आहे. आम्ही ब्रिज बनवू. महापालिका शाळांमध्ये चांगल्या सुविधा आहेत. पण तरीही या शाळांना खासगी शाळांइतक्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करेन. वाहतुकीची समस्या आहे. मेट्रो आणि वेगवेगळे विकासकामे सुरु आहेत. त्याचा भविष्यात नागरिकांना फायदा होईल. पण आज टेक्नॉलॉजीचा वापर करुन आम्ही नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करु”, असं पीयूष गोयल म्हणाले.