Pradeep Bhide : दूरदर्शनवरील बातम्यांचा आवाज काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन

| Updated on: Jun 07, 2022 | 6:00 PM

संध्याकाळी 7 वाजता नमस्कार, आजच्या ठळक बातम्या... असा आवाज आल्यानंतर लोक टीव्हीसमोर स्तब्ध होऊन बसलेले असायचे. बातम्या सांगण्याची खास शैली आणि भारदस्त आवाजामुळे प्रदीप भिडे हे दूदर्शनच्या बातमीपत्राचा चेहरा बनले होते.

Pradeep Bhide : दूरदर्शनवरील बातम्यांचा आवाज काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन
ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : दूरदर्शनवरील बातमीपत्राचा चेहरा, बातम्यांचा बुलंद आवाज आज विरला. सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे (Pradeep Bhide) यांचं आज निधन झालं. ते 65 वर्षांचे होते. संध्याकाळी 7 वाजता नमस्कार, आजच्या ठळक बातम्या… असा आवाज आल्यानंतर लोक टीव्हीसमोर स्तब्ध होऊन बसलेले असायचे. बातम्या (News) सांगण्याची खास शैली आणि भारदस्त आवाजामुळे प्रदीप भिडे हे दूदर्शनच्या बातमीपत्राचा चेहरा बनले होते. भिडे यांच्यावर आज अंधेरीतील स्मशानभूमीत (Cemetery) अंत्यसंस्कार होणार आहेत.

मुंबई दूरदर्शन केंद्राची सुरुवात 2 ऑक्टोबर 1972 ला झाली. तर 1974 पासून भिडे यांनी मुंबईतील वृत्तविभागात अनुवादक म्हणून कामाला सुरुवात केली. तर वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी बातम्या देण्यास सुरुवात केली होती. त्याचबरोबर कामगार विश्व, इ-मर्क कंपनीत जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं. तसंच 1980 मध्ये त्यांनी खारमध्ये प्रियंका स्टुडिओची स्थापना केली होती.

एका चांगल्या वृत्तनिवेदकाला आवाजासोबतच भाषेवर प्रभुत्त्व मिळविणे गरजेचं ठरतं. संस्कृत भाषा ही मृत भाषा मानण्याचा प्रघात असला तरी, संस्कृतमधील श्लोक पठण, उच्चारण यामुळे वाणी स्पष्ट होते. शब्दाचा उच्चार कसा करायचा असतो, मोठा शब्द बोलताना, कुठे तोडायचा असतो, हे भाषिक बारकावे आत्मसात करणे श्रेयस्कर ठरते. अर्थाप्रमाणे विराम घेऊन शब्दफेक करता आली पाहिजे, असं प्रदीप भिडे एका मुलाखतीत म्हणाले होते. ‘बातमी सादर करताना, सरळसोट वाचली तर नीरस आणि परिणामशून्य होते, यासाठी शब्दभांडार हवे. बालसुलभ कुतूहल हवे. बातम्या तटस्थपणे, पण आवाजात आवश्यक तो चढउतार, मार्दव निर्माण करून सादर केल्या तर त्या परिणामकारक होतात ‘ असंही त्यांना सांगितलं होतं.