लखमीपूर हिंसेची न्यायालयीन चौकशी करा; काँग्रेस नेते सचिन पायलट यांची मागणी

| Updated on: Oct 04, 2021 | 7:49 PM

उत्तर प्रदेशातील लखमीपूर हिंसेवरून काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. कृषी उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न दाखवलेल्या भाजपाला देशतील शेतकऱ्यांनी नाकारले आहे. (Sachin Pilot slams ‘manhandling’ of Priyanka Gandhi by UP police)

लखमीपूर हिंसेची न्यायालयीन चौकशी करा; काँग्रेस नेते सचिन पायलट यांची मागणी
Sachin Pilot
Follow us on

मुंबई: उत्तर प्रदेशातील लखमीपूर हिंसेवरून काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. कृषी उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न दाखवलेल्या भाजपाला देशतील शेतकऱ्यांनी नाकारले आहे. शेतकऱ्यांवर भाजप कार्यकर्ते करत असलेले हल्ले गंभीर आहेत. उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील शेतकरी आंदोलनातील हिंसेची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी सचिन पायलट यांनी केली.

सचिन पायलट आज मुंबईत होते. आझाद मैदान येथील काँग्रेस कार्यालयात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पायलट यांनी भाजपवर हल्ला चढवला. शेतकरी आंदोलन दाबवण्याचा केंद्र सरकार व भाजपा प्रयत्न करत असून त्यात त्यांना यश येणार नाही. हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर हे शेतकऱ्यांच्या विरोधात भाजपा कार्यर्त्यांना लाठी उचला, असे सांगत आहेत. हा प्रकार देशातील लोकशाहीची मुळे उखडण्याचा प्रकार आहे, असा आरोप पायलट यांनी केला.

कायदा सुव्यवस्था कशी बिघडते?

लखीमपूर येथील शेतकरी आंदोलनातील पीडितांच्या कुटुंबियास काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी भेटण्यास जात होत्या. त्यांना उत्तर प्रदेश सरकारने बेकायदेशीर रित्या स्थानबद्ध केले. एखादा नेता पीडितांना भेटण्यास जाण्याने कायदा व सुव्यवस्था कशी काय अडचणीत येऊ शकते, असा सवालही त्यांनी केला. साडेसात वर्षात सर्वच आघाड्यावर केंद्रातील मोदी सरकार साफ अपयशी ठरले आहे. विद्यार्थी, शेतकरी, मध्यमवर्ग, युवक, व्यापारी सर्वजण त्रस्त आहेत. मात्र केंद्राच्या विरोधातील लढाई ही राजनैतिक मार्गानीच लढली पाहिजे, अहिंसेच्या मार्गाने केंद्र सरकारला प्रत्युत्तर दिले पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं.

गुजरातमधील ड्रग्जच्या साठ्याचं काय झालं?

गुजरातमध्ये 21 हजार कोटींचे अंमली पदार्थ एका कंपनीने आयात केले होते. मात्र त्याची माहिती गुजरात सरकार दडपून ठेवत असून या प्रकाराची सर्वोच्च न्यायालयामार्फत चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी यांनी केली. देशात ड्रग्ज रुट बनवला जात आहे, असा आरोप पायलट यांनी केला.

 

तर जेलभरो करू

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारवर टीका केली. काँग्रेस नेत्या व सरचिटणीस प्रियंका गांधी लखीमखेरी येथील पीडित शेतकरी कुटुंबाला भेटण्यासठी जात असताना त्यांची अडवणूक केली, त्यांच्याशी पोलिसांनी गैरवर्तन केले आणि शेवटी बेकायदेशीर अटकही केली. या सर्व घटनांचा निषेध करुन प्रियंका गांधी यांना सोडा नाहीतर राज्यभर जेलभरो आंदोलन करु, असा इशारा पटोले यांनी दिला. भाजपा सरकार सातत्याने शेतकऱ्यावर अन्याय करत असून महाराष्ट्रातही शेतकरी संकटात असताना मदत देण्यात दुजाभाव केला जात आहे. त्यावरही भाजपा राजकारण करत आहे. या सर्वांचा हिशोब भाजपाला द्यावा लागेल, असंही ते म्हणाले.

राज्यभर आंदोलन

लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना क्रूरपणे गाडीखाली चिरडणाऱ्या आधुनिक जनरल डायर योगी सरकारच्या निषेधार्थ सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथे आंदोलन करण्यात आले. तर जळगाव येथे प्रदेश उपाध्यक्ष उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले तसेच लातूर, सोलापूरसह राज्यभर सर्व जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी भाजपा व उत्तर प्रदेश सरकारविरोधात आंदोलन करुन निषेध करण्यात आला. यावेळी भाजपा व उत्तर प्रदेशातील अजयसिंह बिष्ट सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या बेकायदेशीर अटकेचा निषेधही करण्यात आला.

 

संबंधित बातम्या:

रावण दहन करा, पण प्रेक्षकांना बोलवू नका; नवरात्रौत्सवासाठी गृहविभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

VIDEO: आर्यन बेकायदेशीरपणे ताब्यात, व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये काहीच नाही, केवळ तपासासाठी आरोप; वकिलाचा दावा

बाप म्हणून शाहरुख खानला वाट बघण्याशिवाय काहीच पर्याय नाही? आज कोर्टात नेमकं काय झालं? पुढे काय होणार?

(Sachin Pilot slams ‘manhandling’ of Priyanka Gandhi by UP police)