कॅबिनेटमध्ये राज्यापालांच्या निषेधाचा ठराव करा, मांजरासारखं डोळे मिटून बसू नका; संजय राऊत यांनी फटकारले

| Updated on: Dec 01, 2022 | 11:24 AM

कोण म्हणतं असं? दिल्लीत जाऊन बसा. पंतप्रधानांच्या दारात ठाण मांडून बसा महाराष्ट्रासाठी. ते तर तुमच्या हातात आहे ना? मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांना पत्र पाठवावं.

कॅबिनेटमध्ये राज्यापालांच्या निषेधाचा ठराव करा, मांजरासारखं डोळे मिटून बसू नका; संजय राऊत यांनी फटकारले
संजय राऊत यांनी फटकारले
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: भाजपच्या दिल्लीतील नेत्याने शिवाजी महाराजांना माफीवीर ठरवलं. राज्यपालांनी महाराज नायकच नाही. ते जुने झाले असं सांगितलं. आता एका बेईमान व्यक्तीशी तुलना करून महाराष्ट्राचा पुन्हा एकदा अपमान करण्यात आला आहे. हे खोके सरकार आहे. कुख्यात सरकार आहे. कोण सर्वाधिक महाराजांचा अपमान करेल, अशी काय या सरकारमध्ये स्पर्धा लागलीय का? असा संतप्त सवाल करतानाच कौन बनेगा करोडपती सारखं त्यांना काय दिल्लीने मोठं बक्षीस लावलंय का? कौन करेगा छत्रपती का अपमान? असं काही सुरू आहे का? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

जो उठतोय तो रोज छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करतोय. मुख्यमंत्री आणि खोके आमदार शांत आहेत. छत्रपतींचा अपमान हा हिंदुत्वाचा अपमान नाही का? तुम्हाला लवकरच याचं उत्तर मिळेल, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

हे सरकार आणि त्यांचे प्रमुख लोक आहेत. मंत्री, नेते आणि राज्यपालांमध्ये महाराजांचा अवमान करण्याची स्पर्धा लागली आहे. कोण शिवाजी महाराजांचा सर्वाधिक अपमान करेल ही स्पर्धा लागली आहे. मोठी स्पर्धा आहे. त्यात मंगल प्रभात लोढा हे आले आहेत. ठिक आहे. ही स्पर्धा तुम्ही करत असाल तर राज्यातील जनता डोळे मिटून गप्प बसली नाही. सर्व पाहात आहे. लवकरच महाराजांचा अवमान करणाऱ्यांना करारा जवाब देईल, असा इशाराही त्यांनी दिला.

निदान राज्याच्या पर्यटन मंत्र्यांना तरी महाराजांचा खरा इतिहास माहीत पाहिजे. जगभरातून पर्यटक येतात ते महाराजांचा इतिहास पाहायला येतात. किल्ले बघायला येतात. महाराजांचा संघर्ष समजून घ्यायला येतात. पर्यटन मंत्री चुकीचं विधान करत त्यांची तुलना एका बेईमान माणसाशी करतात. महाराज काय बेईमान होते काय? तुम्ही छत्रपतींनाच बेईमान ठरवत आहात, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

राज्यपालपद हे संवैधानिकपद असल्याने आम्हाला त्यांच्यावर कारवाई करता येत नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते. बावनकुळे यांच्या या उत्तरावर राऊत यांनी संताप व्यक्त केला.

कोण म्हणतं असं? दिल्लीत जाऊन बसा. पंतप्रधानांच्या दारात ठाण मांडून बसा महाराष्ट्रासाठी. ते तर तुमच्या हातात आहे ना? मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांना पत्र पाठवावं. कॅबिनेटने निषेध ठराव करावा. हे तर तुमच्या हातात आहे ना? असा सवाल त्यांनी केला.

हे लोकं राज्याला मुर्ख बनवत आहेत. हे लोक महाराजांचा अपमान डोळे मिटून पाहत आहेत. हे मांजरं आहेत. मांजर जरी डोळे मिटून दूध पित असली तरी लोक सर्व पाहत असतात, असा इशाराच त्यांनी दिला.

नाशिक दौरा आहे. मी तुरुंगातून सुटल्यावर पहिला दौरा आहे. नाशिक उत्तर महाराष्ट्रात जातोय. त्यानंतर महाराष्ट्रातही जाणार. पण सुरुवात नाशिकपासून करतोय. उद्या नाशिकला आहे. नांदगाव, सिन्नर अशा बऱ्याच ठिकाणी शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेण्याचा कार्यक्रम आहे. दोन दिवसांचा कार्यक्रम आहे, असं त्यांनी सांगितलं.

राज्यातील वातावरण पाहत आहोत. काही लोकांना वाटतं पक्ष संपला आहे. पण नाही. पक्ष वाढत आहे. भास्कर जाधव फिरत आहेत. सुषमा अंधारे फिरत आहेत. विनायक राऊत फिरत आहेत. स्वत: आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला. त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला, असं त्यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे बुलढाण्यात गेले. तिथे उदंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील जनता शिवसेना नेत्यांची वाट पाहत आहे. शिवसेनेची वाट पाहत आहे. 40 खोके आमदार गेले असले तरी शिवसैनिक आणि शिवप्रेमी जागेवरच आहेत आणि शिवसेनेच्या पाठिशी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.