Swine Flu In Mumbai: मुंबईत स्वाईन फ्लूचा कहर, रुग्णांचा आकडा चिंता वाढविणारा

| Updated on: Aug 09, 2022 | 7:45 AM

पावसाळी आजार वाढत असल्याने मुंबईकरांचे टेन्शन वाढले आहे. यामध्ये दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफाइड, कॉलरा, कावीळ असे आजार होतात, तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया असे आजार पसरत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

Swine Flu In Mumbai: मुंबईत स्वाईन फ्लूचा कहर, रुग्णांचा आकडा चिंता वाढविणारा
Follow us on

मुंबई, कोरोनाच्या धोक्यातून नुकतेच सावरत असलेल्या मुंबईकरांसाठी आता आणखी एक नवीन संकट दार ठोठावत आहे. पावसाळी आजारांनी डोकं वर काढलं असून स्वाइन फ्लूच्या (Swine Flu In Mumbai) रुग्णांमध्ये सलग दुसऱ्या आठवड्यात मोठी वाढ (Cases Increase) झाली आहे. आठवडाभरात स्वाइन फ्लूचे तब्बल 80 रुग्ण आढळले आहेत. ही आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे. शिवाय मलेरिया (Malaria) आणि गॅस्ट्रो (Gastro) रुग्णांमध्येही मोठी वाढ होत असून मलेरियाचे 218 गॅस्ट्रोचे 199 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका पालोक प्रशासन करत आहे. पावसाळी आजार वाढत असल्याने मुंबईकरांचे टेन्शन वाढले आहे. यामध्ये दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफाइड, कॉलरा, कावीळ असे आजार होतात, तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया असे आजार पसरत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. गेल्या आठवड्यात मलेरियाचे 154, डेंग्यूचे 17, लेप्टो 23, स्वाइन फ्लूचे 51 आणि गॅस्ट्रोचे तब्बल 184 रुग्ण आढळले होते.

 

नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न

घरोघरी तपासणी आणि औषध- गोळ्यांचे वाटप करून  यावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जाहीर केलेल्या पावसाळी आजारांच्या अहवालावरून रुग्णांची वाढ कायम असल्याचे  स्पष्ट झाले आहे. दरम्यान, वाढणारे पावसाळी आजार रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही करण्यात येत असून दीड हजार बेड तैनात ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

हे सुद्धा वाचा

काळजी घेण्याचे आवाहन

स्वाइन फ्लू आजारात ताप, कफ, घशात इन्फेक्शन, शरीर जखडणे, डोकेदुखी, अतिसार, उलटी अशी लक्षणे आहेत. त्यामुळे अशी लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. शिंकताना, खोकताना नाकावर रुमाल धरावा. वेळोवेळी हात साबण पाण्याने स्वच्छ धुवावेत. डोळे-कान-तोंडाला वारंवार स्पर्श करू नये. गर्दी टाळावी. नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा. पाणी साचू देऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

 

रुग्णांची आकडेवारी

 

  1.  मलेरिया- 218
  2.  लेप्टो- 13
  3.  डेंग्यू- 27
  4. गॅस्ट्रो- 119
  5. हिपेटायटीस- 16
  6. चिकुनगुनिया- 2
  7.  स्वाईन फ्लू (H1N1)- 80