नेस्कोतील ड्रग्स पार्टीबाबतच्या दोन धक्कादायक गोष्टीसमोर, प्रसिद्ध व्यक्तीही होता हजर; नवी अपडेट काय?

गोरेगावच्या नेस्को सेंटरमधील म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्स ओव्हरडोजमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. एक प्रसिद्ध व्यक्ती देखील या पार्टीमध्ये हजर होती. आता ही व्यक्ती कोण होती? वाचा सविस्तर...

नेस्कोतील ड्रग्स पार्टीबाबतच्या दोन धक्कादायक गोष्टीसमोर, प्रसिद्ध व्यक्तीही होता हजर; नवी अपडेट काय?
NESCO
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 15, 2026 | 1:34 PM

कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी: गोरेगाव येथील नेस्कोमध्ये झालेल्या कॉन्सर्टने ड्रग्स पार्टीचे रूप धारण केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पार्टीने राज्यात खळबळ माजली आहे. दोन तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाने जोर धरला. आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

या प्रकरणात दोन धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. पहिली धक्कादायक गोष्ट म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागाने या कार्यक्रमाला पूर्ण परवानगी दिली होती. नेस्को कॉन्सर्टमध्ये मद्यप्राशन करण्यासाठी अधिकृत परवानगी होती आणि कंपनीकडे रात्री १:३० वाजेपर्यंत मद्यसेवा देण्याचा परवाना देखील होता. मात्र रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात मद्यसोबत ड्रग्सचे सेवनही मोठ्या प्रमाणात झाल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या सर्व बाबींकडे कानाडोळा केल्याचा आरोप केला जात आहे.

ऑरी या पार्टीला उपस्थित

दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे, प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर ऑरी या पार्टीला उपस्थित होता. याआधी ऑरीवर ड्रग्स सेवनाचे आरोप झाले आहेत आणि मुंबई पोलिसांनी त्याची दुसऱ्या गुन्ह्यात चौकशीही केली आहे. आता गोरेगाव नेस्को कॉन्सर्ट प्रकरणात ऑरी उपस्थित असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात तो नाचताना स्पष्ट दिसत आहे.

दोघांचा मृत्यू

ड्रग्स ओव्हरडोसमुळे दोन तरुण-तरुणींचा मृत्यू झाला आहे. मयत झालेल्या दोघांनी एकापेक्षा अधिक (दोन किंवा त्याहून अधिक) ड्रग्सच्या गोळ्या घेतल्याने ओव्हरडोस झाला. बचावलेल्या मुलीला मात्र ड्रग्स ओव्हरडोसमुळे उलट्या झाल्याने जीव वाचला असावा, असे डॉक्टरांचे मत आहे. दोघांनी पार्टीत जाण्यापूर्वी एक-एक कॅप्सूल घेतली होती आणि नेस्कोला पोहोचल्यानंतर दुसरी कॅप्सूल घेतली होती.

१५ ते २० जणांचे जबाब नोंदवले

वनराई पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत १५ ते २० जणांचे जबाब नोंदवले आहेत. पार्टीत सहभागी असलेल्या आणि संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. सध्या पोलिस इतर सहभागी तरुण-तरुणींचे जबाब नोंदवण्याचे प्रयत्न करत आहेत.

कॉन्सर्ट संपल्यानंतर मध्यरात्री नशेत असलेले तरुण नेस्कोच्या पार्किंगमध्ये धिंगाणा घालताना दिसले. पार्किंगमधील गाड्यांवर चढून नशेत तरुणांचा उच्छाद दाखवणारे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. मद्यधुंद अवस्थेतील या तरुणांचा हा प्रकार पाहून स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नवी अपडेट काय?

पोलिस सध्या पार्टीत उपस्थित असलेल्या इतर तरुणांचे जबाब नोंदवण्यावर भर देत आहेत. ड्रग्स पुरवठादार कोण, कोणत्या प्रकारचे ड्रग्स वापरले गेले आणि यामागे कोणती साखळी आहे, याची चौकशी सुरू आहे. इन्फ्लुएन्सर ऑरीच्या उपस्थितीमुळे या प्रकरणाला नवे वळण आले आहे. पोलिसांनी अद्याप कोणत्याही अधिकृत अटकेची माहिती दिलेली नाही, मात्र तपास वेगाने सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

Follow Us