मुंबईतील मॉलमध्ये फिरायला नेलं, बिअर पाजली अन्… डेटिंग ॲपवरील मैत्री बहिणींना पडली महागात
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. दोन बहिणींची डेटिंग अॅपच्या माध्यमातून दोन तरुणांशी ओळख झाली. त्यानंतर त्यांना भेटायला बोलावले. मॉलमध्ये फिरवलं. नंतर जे काही घडलं ते भयानक होतं.

नवी मुंबईतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. टिंडर या डेटिंग ॲपवरून ओळख झाल्यानंतर भेटीसाठी बोलावलेल्या दोन सख्ख्या बहिणींना सीवूड्स येथील हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दोघींमध्ये एक मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती आहे. या प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी प्रकरण नवी मुंबईतील एनआरआय सागरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, सांताक्रूझ परिसरात राहणाऱ्या दोन बहिणींची काही दिवसांपूर्वी टिंडर ॲपद्वारे दोन तरुणांशी ओळख झाली होती. ऑनलाइन चॅटिंगद्वारे आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर दोघींना सीवूड्स येथे भेटण्यासाठी बोलावले. मुलींना येण्यासाठी आरोपींनी ऑनलाइन टॅक्सीही बुक करून दिली होती. सीवूड्स येथे पोहोचल्यानंतर आरोपींनी दोन्ही बहिणींना मॉलमध्ये आणि इतर ठिकाणी फिरवले. त्यानंतर त्यांना एका ठिकाणी नेऊन बिअर पिण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. दोघी मद्यधुंद झाल्यानंतर विश्रांती घेण्याच्या बहाण्याने त्यांना सीवूड्समधील एका हॉटेलमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांच्या असहायतेचा फायदा घेत मध्यरात्री अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
घटनेनंतर दोन्ही बहिणींनी घरी परतल्यानंतर पालकांना संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही बहिणींची वैद्यकीय तपासणी केली असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
आरोपींची ओळख पटवण्यासाठी मॉल आणि हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. तसेच आरोपींनी बुक केलेल्या ऑनलाइन टॅक्सीच्या तपशीलावरूनही त्यांचा माग काढण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. अल्पवयीन मुलीला हॉटेलमध्ये प्रवेश कसा मिळाला, याबाबत हॉटेल व्यवस्थापनाचीही चौकशी केली जात आहे.