महापालिकेच्या विशेष लसीकरण मोहिमांच्या नियोजनासाठी मुंबईत उद्या लसीकरण बंद

| Updated on: Sep 09, 2021 | 4:19 PM

कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत नागरिकांना दोन्ही डोस देवून अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने विशेष सत्र राबविण्यात येत आहेत.

महापालिकेच्या विशेष लसीकरण मोहिमांच्या नियोजनासाठी मुंबईत उद्या लसीकरण बंद
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

मुंबई : कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत नागरिकांना दोन्ही डोस देवून अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने विशेष सत्र राबविण्यात येत आहेत. त्या दृष्टीने पुढील नियोजन करुन प्रशासकीय व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात येत आहे. या कारणाने मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर शुक्रवारी (10 सप्टेंबर) कोविड लसीकरण बंद राहणार आहे. दरम्यान, महानगरपालिकेकडे कोविड लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शनिवारी (11 सप्टेंबर) लसीकरण मोहीम पूर्ववत सुरु राहणार आहे. (Vaccination will be closed in Mumbai tomorrow for planning of special vaccination campaigns of BMC)

अधिकाधिक नागरिकांना कोविड लसीच्या दोन्ही मात्रा देवून लसीकरण पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. ज्ये‍ष्ठ नागरिकांसाठी ड्राइव्ह इन लसीकरण, अंथरुणास खिळलेल्या व्यक्तिंचे त्यांच्या घरी जावून लसीकरण, एलजीबीटी समुदायातील नागरिकांसाठी विशेष लसीकरण केंद्र, दुसरी मात्रा देय असलेल्या‍ नागरिकांसाठी एक संपूर्ण दिवस विशेष सत्र असे विविध उपक्रम राबवताना सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचून कोविड लसीकरण मोहीम वेगाने राबवली जात आहे. फक्‍त महिलांसाठी विशेष कोविड लसीकरण सत्र राबविण्‍याचे देखील विचाराधीन आहे, असे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.

येत्या काळातील अशा विशेष लसीकरण मोहिमांचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी प्रशासकीय व तांत्रिक बाबींची पूर्तता करणे आणि सर्व संबंधित लसीकरण केंद्रांना आवश्यक सूचना देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येत आहे. यास्तव, उद्या (10 सप्टेंबर) कोविड लसीकरण बंद राहणार आहे. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

गणेशोत्सवदरम्यान ठाण्यात लसीकरण बंद राहणार

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी ठाणे शहरातील सर्व केंद्रावरील लसीकरण दिनांक 10, 11, 14, 16 व 19 सप्टेंबर 2021 रोजी बंद राहणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

संपूर्ण राज्यात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सणासुदीच्या काळात लसीकरणासाठी घराबाहेर पडल्यावर त्यांची गैरसोय होवू नये यासाठी सर्व केंद्रावरील लसीकरण दिनांक 10, 11, 14, 16 व 19 सप्टेंबर 2021 रोजी बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

गणेशोत्सवानिमित्त कोकणवासीयांना मुख्यमंत्र्यांकडून 1.40 लाख डोस

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास बाब म्हणून लसीचे 1 लाख 40 हजार डोस दिले असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली. कोकणवासीय गणेशोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतात. कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन आणि गणेश भक्तांच्या आरोग्याची काळजी घेऊन मंत्री सामंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लसीकरणासाठी लसींच्या अधिक डोसची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी आज रत्नागिरी साठी 40 हजार तर सिंधुदुर्गसाठी 69 हजार डोस दिले आहेत.

इतर बातम्या

Covid Vaccination: महाराष्ट्राचा आणखी एक विक्रम; एकाच दिवसात 14.39 लाख नागरिकांना टोचली लस

शरद पवार-मुख्यमंत्र्यांची तासभर बैठक, राज्यातील कोणत्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा?

मुंबईतही कलम 144, गणेशोत्सवात जमावबंदी आदेश, 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई

(Vaccination will be closed in Mumbai tomorrow for planning of special vaccination campaigns of BMC)