4 हजार रुपये एन्ट्री फी, कार्यक्रमानंतर सर्वच झिंगतात… वरळीतील डोम कॉन्सर्टचं डार्क सीक्रेट आलं समोर

वरळी येथील एनएससीआय डोम कॉन्सर्टमध्ये एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. 4000 रुपये एन्ट्री फी असलेल्या या कॉन्सर्टमध्ये दारू आणि ड्रग्सचा वापर झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, आयोजकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि अशा कार्यक्रमांचे 'डार्क सिक्रेट' समोर येत आहे.

4 हजार रुपये एन्ट्री फी, कार्यक्रमानंतर सर्वच झिंगतात... वरळीतील डोम कॉन्सर्टचं डार्क सीक्रेट आलं समोर
Worli Dome
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 07, 2026 | 1:07 PM

वरळी येथील एनएससीआय डोममध्ये एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर या तरुणाची मैत्रीण अस्वस्थ असून तिच्यावर उपचार सुरू आहे. या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये हजारो तरुण तरुणी सामील झाले होते. या तरुणाने ड्रग्स घेतले होते का? या म्युझिक शोमध्ये ड्रग्सचा वापर झाला का? याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या कॉन्सर्टमधील तरुणाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. दरम्यान, गोरेगावनंतर वरळीतही हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

वृषभ गांगुर्डे असं या 28 वर्षीय तरुणाचं नाव आहे. त्याने अतिमद्यपान केलं होतं. त्यामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. तर त्याच्या 28 वर्षीय मैत्रीणीवर उपचार सुरू आहेत. स्पेसबाऊंड या कंपनीने या कॉन्सर्टचे आयोजन केलं होतं. पोलिसांनी स्पेसबाऊंड कंपनीच्या आयोजकांची चौकशी सुरू केली आहे.

अद्याप गुन्हा नाही

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव पंचनामा केला. त्यानंतर 8-10 जणांची ताडदेव पोलीस ठाण्यात चौकशी सुरू करण्यात आली आहे. या कॉन्सर्टसाठी पोलिसानी आधी परवानगी नाकारली होती. पण पुन्हा पोलिसानी परवानगी का दिली? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या कॉन्सर्टमध्ये मद्यपानासाठी परवानगी होती का? आणि इतर परवानग्यांची तपासणी सुरू आहे. आयोजकांसहीत अन्य काही जणांची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. मात्र, वरळी कॉन्सर्ट प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. वृषभच्या मृत्यूबद्दल फक्त अपमृत्यूची नोंद करण्यात आलीय. गुन्हा दाखल करता येऊ शकतो का याची पोलिसांकडून चाचपणी सुरू आहे. प्राथमिक तपासात तरुणाच्या मृत्यूचे कारण कार्डियाक अरेस्ट (हृदयविकाराच्या धक्क्याने) असल्याचे पोलिसांचे म्हणणे.

कोण आहे वृषभ

वृषभ गांगुर्डेने वकिलीचं शिक्षण घेतलं आहे. त्याने कोलकात्यावरून शिक्षण घेतलं आहे. तर, त्याची मैत्रीणही उच्चशिक्षित आहे. मैत्रिणीसोबत तो या पार्टीला आला होता. हसतमुख असलेल्या वृषभने अति मद्यसेवन केल्यानंतर त्याची प्रकृती बघिडल्याचं सांगितलं जात आहे.

डार्कसाईट काय?

या कॉन्सर्टसाठी एन्ट्री फि मजबूत ठेवण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. प्रत्येक व्यक्तीला 4 हजार रुपये इतका तिकिटाचा दर ठेवण्यात आला होता, अशी माहिती समोर आली आहे. तर या घटनेनंतर एसएससीई क्लबचे सदस्य सुरेंद्र दुग्गल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी एनएससीआयचा मेंबर आहे. काल इथली परिस्थिती भयानक होती. मी कार्यक्रमासाठी इथे आलो होतो. मोठ्या प्रमाणात तरुणाई इथे जमली होती. हा कार्यक्रम झाल्यानंतर यातील अनेक तरुण शुद्धीत नसतात. घडलेल्या या प्रकारासाठी मॅनेजमेंटला दोषी धरले पाहिजे. पोलिसांनी यांना परवानगी दिलीच कशी? असा सवालही उपस्थित होत आहे, असं दुग्गल म्हणाले.

दरम्यान, पोलिसांनी संबंधित मुलीची चौकशी केली आहे. या मुलीने मद्य आणि एनर्जी ड्रिंक्स घेतल्याचं म्हटलं आहे. कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाचं सेवन केलं नसल्याचं या मुलीने स्पष्ट केलं आहे. तर, पोलीस या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करणार आहे.

Follow Us