
नागपूर जिल्ह्यातील सोलर एक्सप्लोसिव्ह (SBL) कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कंपनीचे दोन मुख्य संचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण ११ जणांना अटक करण्यात आली आहे. सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी न्यायालयाने ९ आरोपींना ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नागपूरच्या SBL कंपनीतील स्फोटाप्रकरणी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत कंपनीचे संचालक रवी प्रकाश चंद्र कामरा आणि राकेश सुदर्शन तिवारी यांनाही ताब्यात घेतले आहे. या दोन बड्या नावांच्या अटकेमुळे औद्योगिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या कंपनीच्या सुरक्षेतील त्रुटी आणि व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा यांमुळे हा स्फोट झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतींची जबाबदारी असलेले अधिकारी आणि प्रोडक्शन मॅनेजर्स यांनी सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणात बिल्डिंग १६-A आणि १६-B च्या जबाबदार अधिकाऱ्यांसह लोडिंग आणि प्रोडक्शन सुपरवायझर्सनाही आरोपी करण्यात आले आहे.
दरम्यान या प्रकरणात एकूण २१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, १० आरोपी फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत. ६ दिवसांच्या पोलीस कोठडी दरम्यान आरोपींची सखोल चौकशी केली जाणार आहे. या स्फोटाचे नेमके तांत्रिक कारण आणि सुरक्षेतील त्रुटींची कागदपत्रे तपासली जाणार आहेत.
नागपूरच्या SBL कंपनीत १ मार्च २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास भीषण स्फोट झाला. नागपूरच्या काटोल तालुक्यातील रावळगाव येथील SBL कंपनीच्या डेटोनेटर पॅकिंग युनिटमध्ये हा स्फोट झाला. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत १७ कामगारांचा मृत्यू झाला असून २३ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. या मृतांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. प्राथमिक तपासात या कंपनीने सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे आणि तांत्रिक त्रुटी असल्याचे समोर आले आहे.