Video – Nagpur Crime | दुचाकीस्वार आले, वृद्ध महिलेच्या हातून पैशांची पिशवी घेऊन पळाले! सीसीटीव्हीत घटना कैद
नागपुरात बँकेतून रोकड काढून दुचाकीने जाणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याचे लुटारुंनी 5 लाख रुपये लुटले. ही घटना नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत घडली. लुटीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.

नागपूर : नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन (MIDC Police Station) हद्दीत एका वयोवृद्ध दाम्पत्याला लुटल्याची घटना पुढे आली. ही लुटीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. धक्कादायक म्हणजे लुटण्यात आलेले वृद्ध सेवानिवृत्त पोलीस अधिकारी (Retired Police Officer) आहेत. शिवप्रसाद विश्वकर्मा आणि त्यांची पत्नी मीना विश्वकर्मा काल दुपारी एमआयडीसी परिसरातील एसबीआय बँकेत गेले होते. पाच लाख रुपयांची रोकड काढून पिशवीत भरून दुचाकीकडे जात होते. पार्किंगजवळ दोन बाईकस्वारांनी त्यांच्या हातातील पिशवी हिसकावून पळ (bag snatched and fled) काढला.
पिशवी हिसकावली नि पळ काढला
घराच्या बांधकामासाठी ते पत्नीसोबत स्कुटरने एसबीआय बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. बँकेतून पाच लाख रुपये काढल्यानंतर पिशवीत ठेवून पत्नीच्या हातात ती पिशवी दिली. बँकेच्या बाहेर रस्त्यावर ठेवलेली स्कुटर सुरू करीत असताना मागून मोटरसायकलवर दोन आरोपी आले. मीना यांच्या हातातील ती पिशवी हिसकावून पळ काढला.
पाहा व्हिडीओ
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास
विश्वकर्मा दाम्पत्य प्रचंड घाबरले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलीस हिंगणा मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींचा शोध घेत आहे. आरोपी हे बँकेमधूनच वृद्ध दाम्पत्याच्या मागावर असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे बँकेतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.