नांदेड शेतकरी मृत्यू प्रकरणात SIT स्थापन, फायनान्स कंपनीचा म्होरक्या ताब्यात; तपासाला वेग

शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. आतापर्यंत 5 जणांना ताब्यात घेण्यात आले असून, फायनान्स कंपनीच्या कारभाराची जबाबदारी पाहणाऱ्या व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात तपासातून आणखी काय समोर येणार?

नांदेड शेतकरी मृत्यू प्रकरणात SIT स्थापन, फायनान्स कंपनीचा म्होरक्या ताब्यात; तपासाला वेग
Nanded farmer Chandrakant Shinde death case
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 27, 2026 | 5:14 PM

नांदेडमध्ये शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या मृत्यू प्रकरणाला आता वेग आला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैंजने यांच्या अध्यक्षतेखाली हे पथक काम करणार आहे. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात 5 आरोपींना ताब्यात घेतले असून, फायनान्स कंपनीचा संपूर्ण कारभार पाहणाऱ्या शेख अस्लम यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी याबाबत माहिती दिली.

10 जणांचे एसआयटी पथक स्थापन

शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास अधिक प्रभावीपणे करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैंजने यांच्या अध्यक्षतेखाली हे पथक काम करणार आहे. या पथकामध्ये 3 अधिकारी आणि 6 कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. एकूण 10 जणांची टीम या प्रकरणाचा तपास करणार असल्याचे पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी सांगितले.

Loading...

फायनान्स कंपनीचा कारभार पाहणारा शेख अस्लम ताब्यात

या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 5 आरोपींना ताब्यात घेतले आहे. खालसा फायनान्सचा संपूर्ण कारभार पाहणाऱ्या शेख अस्लम यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या प्रकरणातील तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या मृत्यूमागील नेमके कारण आणि या घटनेत कोणाची भूमिका होती, याचा तपास आता एसआयटीकडून केला जाणार आहे.

फायनान्स कंपनीच्या कार्यालयात आढळला होता मृतदेह

नांदेडमधील हिंगोली गेट परिसरातील खाजगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकरी चंद्रकांत दगडूजी शिंदे यांचा मृतदेह आढळला होता. ते मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील रहिवासी होते. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी हत्या झाल्याचा आरोप केला होता.

कुटुंबीयांच्या आरोपानुसार, चंद्रकांत शिंदे यांनी 7 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, त्यांच्याकडे 75 हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला होता. तसेच कर्जवसुलीसाठी त्यांना बाजारातून नेऊन दोन दिवस डांबून ठेवल्याचाही आरोप करण्यात आला होता. त्यांच्या आई सरास्याबाई यांनी मुलाने आत्महत्या केली नसून त्याला ठार करण्यात आल्याचा आरोप केला होता.

या प्रकरणी खालसा फायनान्सविरोधात वजीराबाद पोलीस ठाण्यात अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली असून, आतापर्यंत 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपासात या प्रकरणातील आणखी कोणते तपशील समोर येतात, याकडे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us