नाशिकच्या प्राध्यापकांची कमाल, दुर्मिळ वनस्पतीच्या प्रजातीचा लावला शोध, काय होणार उपयोग?

| Updated on: Mar 09, 2022 | 7:05 AM

नाशिक जिल्ह्याची ओळख दुर्मिळ वनस्पतींचा जिल्हा अशी आहे. जिल्ह्यावर निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे. यापूर्वी सिरोपेजिया अंजनेरिका, सायलेंटव्हॅलिया चंदवडेंसिस आणि क्रोटालारिया गजुरेलियाना अशा दुर्मिळ वनस्पतींचा येथे शोध लागला आहे. विशेष म्हणजे या दुर्मिळ वनस्पती इतर कोणत्याही ठिकाणी आढळल्या नाहीत. आता या शोधाने त्यात आणखी एका वनस्पतीची भर पडली आहे.

नाशिकच्या प्राध्यापकांची कमाल, दुर्मिळ वनस्पतीच्या प्रजातीचा लावला शोध, काय होणार उपयोग?
नाशिकच्या प्राध्यापकांनी शोधलेल्या वनस्पतीच्या नवीन प्रजातीमुळे कारल्याचे वाण विकसित करायला मदत होणार आहे.
Follow us on

नाशिकः नाशिकमधील (Nashik) तीन प्राध्यापकांनी (Professor) मोमोर्डिका जनार्थस्वामी नावाच्या एका दुर्मिळ वनस्पतींच्या प्रजातींचा शोध लावला आहे. त्यांच्या या शोधनिबंधाला (Research paper) चक्क स्वीडनच्या लुंड विद्यापीठातील नॉरडिक जर्नल ऑफ बॉटनी या संशोधन पत्रिकेत स्थान मिळाले आहे. या वनस्पतीचा शोध लावणाऱ्या या कर्तबगार मंडळींमध्ये व्ही. एन. नाईक महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राचे सहाय्यक प्रा. डॉ. अविनाश घोळवे, त्र्यंबक महाविद्यालयातील प्रा. डॉ. शरद कांबळे आणि आर. वाय. के. सायन्स महाविद्यालयातील प्रा. कुमार विनोद गोसावी आणि संशोधक विद्यार्थी नीलेश माधव यांचा समावेश आहे. डॉ. शरद कांबळे यांनी 22 संशोधनात भाग घेतला आहे. तर डॉ. अविनाश घोळवे आणि डॉ. कुमार विनोद गोसावी यांनी 8 संशोधनात भाग घेतला आहे. त्यांच्या या नव्या शोधामुळे नाशिकचे नाव पुन्हा एकदा सातासमुद्रापार गेले आहे. विद्यार्थी आणि महाविद्यालतील प्राध्यापकांनी त्यांच्या या यशाचे कौतुक केले आहे.

काय आहे वनस्पती?

नाशिकच्या प्राध्यापकांनी मोमोर्डिका जनार्थस्वामी या वनस्पतीचा शोध लावला आहे. ती पेठमधील करंजाळी गावाजवळील कुंभारबारी घाट आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भास्करगड आणि सुरगाणा तालुक्यातील केम डोंगराच्या पायथ्याशी आढळली. ही नवीन प्रजाती कारल्याच्या कुळातील आहे. ही कर्टुले सारखी दिसते. या वनस्पतीचे वैशिष्ट्ये म्हणजे तिला नर आणि मादी फुले पिवळ्या रंगाची मोठी असतात. फळे लांब आणि गोल असतात. त्यांचा उपयोग भाजीसाठी होतो.

6 प्रजाती भारतात

जगात कारल्याच्या एकूण 45 प्रजाती आहेत. त्यात भारतात 6 प्रजाती आणि एक उपप्रजाती आहे. नव्या शोध लावलेल्या प्रजातीचा उपयोग कारल्याचे सुधारित वाण करण्यासाठी होईल, असा दावा या संशोधकांनी केला आहे. गोवा विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. एम. के. जनार्दनम यांचे नाव या प्रजातीला देण्यात आले आहे. डॉ. जर्नादनम यांनी पश्चिम घाटात वनस्पती संवर्धनाचे मोठे काम केले आहे. या कामाचे स्मरण म्हणून त्यांचे नाव या प्रजातीला देण्यात आले आहे.

दुर्मिळ वनस्पतींचा जिल्हा

नाशिक जिल्ह्याची ओळख दुर्मिळ वनस्पतींचा जिल्हा अशी आहे. जिल्ह्यावर निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे. यापूर्वी सिरोपेजिया अंजनेरिका, सायलेंटव्हॅलिया चंदवडेंसिस आणि क्रोटालारिया गजुरेलियाना अशा दुर्मिळ वनस्पतींचा येथे शोध लागला आहे. विशेष म्हणजे या दुर्मिळ वनस्पती इतर कोणत्याही ठिकाणी आढळल्या नाहीत. आता या शोधाने त्यात आणखी एका वनस्पतीची भर पडली आहे.

इतर बातम्याः

Nashik | उद्योजकाच्या घरावर दरोडा; बाळाच्या मानेवर सुरा ठेवून 50 तोळे सोने लुटले, महिलांचे तोंड चिकटपट्टीने बंद!

नाशिक – दिंडोरी सिटी बस सुरू; गामीण भागात वाढवला विस्तार, मार्ग काय राहणार?

मालेगाव महापालिकेचे प्रताप; पोलीस मैदानाच्या सरकारी जागेची इदगाह ट्रस्टला खिरापत