‘रोज काय हेच बनवते…’ संतापलेल्या पतीने पत्नीच्या अंगावर फेकली उकळती कढी, सासूनेही…

नाशिकच्या कोणार्कनगर भागात जेवणात कढी आवडली नाही म्हणून पतीने आणि सासूने सुनेला बेदम मारहाण करत तिच्या अंगावर उकळती कढी ओतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात ३४ वर्षीय विवाहिता गंभीररीत्या भाजली असून आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोज काय हेच बनवते... संतापलेल्या पतीने पत्नीच्या अंगावर फेकली उकळती कढी, सासूनेही...
crime
| Updated on: May 27, 2026 | 1:58 PM

‘रोज काय भाजी करावी?’ या घरगुती विवंचनेतून रात्रीच्या जेवणासाठी बनवलेली कढी एका विवाहितेसाठी जीवघेणी ठरली आहे. जेवण आवडले नाही या अतिशय किरकोळ कारणावरून संतप्त पतीने आपल्या ३४ वर्षीय पत्नीच्या अंगावर थेट उकळती कढी फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकमधील आडगाव हद्दीतील कोणार्कनगर भागात ही घटना घडली. या अमानुष हल्ल्यात विवाहिता गंभीररीत्या भाजली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्षुल्लक कारणावरून वाद विकोपाला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३४ वर्षीय विवाहिता सुनीता गौतम कांबळे ही तिच्या पती आणि सासूसोबत कोणार्कनगर येथील चौंडेश्वरीनगर या भागात वास्तव्यास आहे. गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास घरात नेहमीप्रमाणे जेवणाची वेळ झाली होती. सुनीताने रात्रीच्या जेवणात कढी बनवली होती. पती घरी आल्यानंतर तिने त्याला गरम कढी आणि जेवणाचे ताट वाढून दिले. मात्र, ताटात कढी पाहताच पतीचा पारा चढला. मला कढी आवडत नाही, तरीही का बनवली, रोज काय हेच बनवते? असे म्हणत पतीने सुनीताशी वाद घालण्यास सुरुवात केली.

हा वाद सुरू असतानाच सासूने देखील मध्यस्थी करत सुनेविरुद्ध पतीला चिथावणी देण्यास सुरुवात केली. सासूच्या चिथावणीमुळे पती आणखी हिंसक झाला. त्यानंतर त्यांच्यातील वाद थेट हाणामारीवर पोहोचला. संशयित पतीने आधी पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यांचा राग एवढ्यावरच त्याचा राग शांत झाला नाही. तर त्याने गॅसवरून उतरवून आणलेली उकळत्या कढीची वाटी थेट सुनीता यांच्या अंगावर भिरकावली.

उकळती कढी अंगावर पडल्यामुळे सुनीता यांच्या मानेच्या डाव्या बाजूचा खालचा भाग, पाठ, डावा खांदा आणि दंड गंभीररित्या भाजले. गरम कढीमुळे त्वचा भाजल्याने त्यांना प्रचंड वेदना झाल्या. एवढा अमानुष छळ करूनही सासरच्यांचे मन भरले नाही. त्यांनी सुनीता यांना पुन्हा मारहाण केली आणि या घटनेबाबत कोणालाही सांगितल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. शेवटी पीडितेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल

या भयंकर घटनेनंतर पीडित सुनीता कांबळे यांनी दिलेल्या जबाबावरून आडगाव पोलीस ठाण्यात पती आणि सासूविरोधात कौटुंबिक हिंसाचार, अमानुष मारहाण आणि गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे नाशिक परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Follow Us