सरकारच्या रक्तातच गद्दारी, कांदा अनुदानावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले…

| Updated on: Mar 13, 2023 | 3:56 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिकिलो 3 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. त्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जहरी टीका केली आहे.

सरकारच्या रक्तातच गद्दारी, कांदा अनुदानावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ( Onion Farmer ) कांद्याला दर मिळत नाही म्हणून आक्रमक भूमिका घेतली होती. त्याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी राज्यातील विविध पक्षांनी आंदोलने करत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बाजू मांडली होती. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील कांद्याचा मुद्दा लावून धरत सरकारच्या विरोधात निदर्शने केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत असल्याचं म्हणत कांद्याच्या संदर्भात सानुग्रह अनुदान जाहीर केले होते. यामध्ये तीनशे रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटलंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सानुग्रह अनुदान तीनशे रुपये जाहीर करत असतांना शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे म्हंटले होते. त्याच दरम्यान तुम्ही फक्त गाजर दाखविण्याचे काम केले होते आम्ही गाजराचा हलवा दिला असे म्हणत शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला होता.

मात्र, कांद्याल प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान द्यायला हवे होते. तसे न करता 300 रुपये सानुग्रह अनुदान देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. खरंतर सरकारने आमच्याकडे काही सूचना मागितल्या होत्या. पण त्या सूचनांचा कुठेही विचार केलेला नाही असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी म्हंटलं आहे.

हे सुद्धा वाचा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधक आत्तापर्यंत हे सरकार गद्दारी करून आल्याचे म्हणत होतं मात्र आता आम्हाला देखील तसे वाटू लागलं आहे. मुळात या सरकारच्या रक्तातच गद्दारी असल्याचा टोला संदीप जगताप यांनी व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांचा तोंडाला पाने पुसण्याचे काम या सरकारने केलेला आहे. साधारणपणे प्रति किलो दहा रुपये म्हणजेच प्रति क्विंटल हजार रुपये शेतकऱ्यांना अनुदान देण्याची गरज असताना 300 रुपये अनुदान देऊन शेतकऱ्यांची थट्टा केल्याची भावना या वेळेला संदीप जगताप यांनी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांच्या नंतर आता शेतकरी संघटना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयावर भाष्य करू लागलेले आहे. एकंदरीतच जोरदार टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या सानुग्रह अनुदानाच्या निर्णयावर केली जात आहे.