मोठी बातमी ! अंबानी यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवणारा मास्टरमाइंड कोण?, अनिल देशमुख यांनी घेतलं बड्या व्यक्तीचं नाव

| Updated on: Mar 02, 2024 | 2:58 PM

माझ्याकडे जो पेन ड्राइव्ह आहे, त्यात काय आहे हे योग्यवेळी सांगेल. अनिल देशमुख यांनी काही केलं असतं तर 14 वर्ष मला तुरुंगात राहावं लागलं असतं. संपूर्ण देशात असंच सुरू आहे. राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी सुरू आहे. यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, असा आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

मोठी बातमी ! अंबानी यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवणारा मास्टरमाइंड कोण?, अनिल देशमुख यांनी घेतलं बड्या व्यक्तीचं नाव
Anil Deshmukh
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

चंदन पुजाधिकारी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक | 2 मार्च 2023 : भारतातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासासमोरील स्कॉर्पिओमध्ये बॉमब ठेवण्यात आला होता. आम्ही या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. ही चौकशी सुरू असतानाच आपलं नाव पुढे येईल अशी भीती वाटल्याने आरोपीने स्कॉर्पिओच्या चालकाची हत्या केली. या प्रकरणाचीही आम्ही चौकशी केली. दहा दिवस चौकशी केली असता मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग हेच या प्रकरणाचे मास्टर माइंड असल्याचं आढळून आलं. त्यांच्या या प्लानमध्ये सचिन वझे आणि चार एपीआय असल्याचंही आढळून आलं, असा गौप्यस्फोट माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली असता हा खळबळजनक गौप्यस्फोट केला. रिपोर्ट आल्यानंतर आम्ही परमबीर सिंग यांची बदली केली. त्यांना सस्पेंडही केलं. सचिन वझेंनाही काढून टाकलं. त्यानंतर विरोधी पक्षाने या दोघांना एकत्र बोलावलं आणि त्यांना आमच्यावर आरोप करायला सांगितलं. त्यानंतरच परमबीर सिंग यांनी 100 कोटींचा आरोप केला होता. हा आरोप झाल्यावर मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली, असं अनिल देशमुख म्हणाले.

सरकारला आवाहन

मुख्यमंत्र्यांनी चांदीवाल आयोग नेमून चौकशीही सुरू केली. चांदीवाल आयोगाचा अहवाल येऊन आता दीड वर्ष झाले आहे. पण या सरकारने तो सार्वजनिक केला नाही. काल अधिवेशन संपलं. कालपर्यंत हा अहवाल मांडला जाईल याची मी वाट पाहत होतो. सरकारला विधानसभेत विनंतीही केली. पण त्यांनी ऐकलं नाही. हा अहवाल जनतेसमोर आला पाहिजे. आयोगाचे निष्कर्ष समोर आले पाहिजे. जनतेला सत्य कळलं पाहिजे. सरकारने अधिवेशनात अहवाल मांडला नाही. इतर कोणत्या तरी माध्यमातून तो जाहीर केला पाहिजे, असं आवाहन अनिल देशमुख यांनी केलं.

तर कोर्टात जाईल

माझ्यावर जे आरोप झाले त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. मी निवडणूक प्रचारात पेनड्राईव्हच लोकांना दाखवणार आहे. माझ्यावर 100 कोटींचा आरोप झाला. पण 1 कोटी 71 लाखावर चार्जशीट दाखल केले, पण त्याचेही पुरावे कोर्टासमोर दाखवू शकले नाहीत, असं सांगतानाच चांदीवाल अहवाल जाहीर करा. नाही तर वेळ आली तर कोर्टात जाईल, असा इशाराच त्यांनी दिला.