पुण्यातून थेट राजस्थान… नीट परीक्षेचा पेपर नेमका कसा लीक झाला? कितीचे डील? A टू Z माहिती समोर

नीट पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला असून, पुण्यातूनच प्रश्नपत्रिका टेलिग्रामद्वारे राजस्थानला पाठवण्यात आल्याचे सीबीआय तपासात उघड झाले आहे. दीडशे प्रश्नांसाठी १० लाखांची डील झाली होती.

पुण्यातून थेट राजस्थान... नीट परीक्षेचा पेपर नेमका कसा लीक झाला? कितीचे डील? A टू Z माहिती समोर
NEET
| Updated on: May 21, 2026 | 7:52 AM

देशभरात खळबळ उडवणाऱ्या वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक आणि मोठा खुलासा झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे थेट महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहराशी जोडली गेली आहेत. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका पुण्यातूनच लीक होऊन थेट राजस्थानपर्यंत पोहोल्याची माहिती आता समोर आली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CBI) तपासात ही बाब उघड झाली आहे.

टेलिग्रामचा वापर आणि १० लाखांची डील

सीबीआयने केलेल्या तांत्रिक आणि सखोल तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील मुख्य आरोपींनी या घोटाळ्यासाठी टेलीग्राम (Telegram) या मेसेजिंग ॲपचा वापर केला होता. आरोपींनी प्रश्नपत्रिकेच्या पीडीएफ (PDF) फाइल्स टेलिग्रामवरून आधी गुरुग्राम हरियाणा येथे पाठवल्या. त्यानंतर तिथून त्या राजस्थानमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या.

या प्रकरणी मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरव्यवहार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नीटच्या प्रश्नपत्रिकेतील तब्बल १५० प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी प्रति विद्यार्थी १० लाख रुपयांची डील झाली होती. या मोठ्या रक्कमेच्या बदल्यात विद्यार्थ्यांना परीक्षेआधीच पेपर पुरवण्यात आला होता. आता या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी सीबीआयने तपासाचा वेग प्रचंड वाढवला होता. डिजिटल पुरावे, बँक खात्यांचे व्यवहार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सीबीआयचे पथक कसून तपास करत आहे.

दरम्यान पुणे आणि परिसरामध्ये सीबीआयकडून दररोज सरासरी १० ते १५ विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची प्रत्यक्ष चौकशी केली जात आहे. या चौकशीमुळे वैद्यकीय क्षेत्रात आणि पालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. या रॅकेटमध्ये पुण्यातील आणखी काही बड्या कोचिंग क्लासेसचे चालक किंवा एजंट सामील आहेत का, याचा शोध आता सीबीआय घेत आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी काही मोठ्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.

सीबीआयकडून कसून चौकशी सुरू

नीट पेपर फुटी प्रकरणात मुख्य आरोपी मोटेगावकर याला अटक केल्यानंतर आता या घोटाळ्याचे लाभार्थी असणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालकही सीबीआयच्या चौकशीच्या जाळ्यात अडकले आहेत. या प्रकरणी सीबीआयचे एक विशेष पथक गेल्या काही दिवसांपासून पुण्यात तळ ठोकून आहे. यावेळी रोज संबंधित विद्यार्थी आणि पालकांची कसून चौकशी केली जात आहे. मुख्य आरोपीच्या चौकशी दरम्यान ज्या लाभार्थी विद्यार्थ्यांची नावे समोर आली आहेत, त्यांना आणि त्यांच्या पालकांना बोलावून सीबीआयकडून कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. पेपर फुटीचा थेट फायदा घेणाऱ्या या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची कसून चौकशी करून सीबीआय या घोटाळ्याच्या मूळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.

Follow Us