आता चक्रीवादळाचं मोठं संकट, IMD कडून अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट, या तारखा आजच नोट करा
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आता चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. हवामान विभागाकडून अनेक राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आता चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. सध्या निर्माण होत असलेल्या वातावरणामुळे अनेक राज्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात पूर्व मध्य तसेच त्याला लागून असलेल्या दक्षिण -पूर्व भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. येत्या 24 ऑक्टोबर पर्यंत हा कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होणार आहे, त्यानंतर हा पट्टा पश्चिम उत्तरेकडे सरकणार आहे. त्यानंतर हा कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होऊन, 26 ऑक्टोबरपर्यंत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, विशेष: दक्षिणेकडील राज्यांना पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे.
हा कमी दाबाचा पट्टा पुढील दोन दिवसांमध्ये दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारी भागांकडे सरकरणार असल्याने पुढील दोन दिवसांमध्ये ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू पाँडिचेरी, या भागांमध्ये अति मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. 23 ते 25 ऑक्टोबर या काळात तामिळनाडूला तर पावसाचा थेट रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवसांमध्ये एका मोठ्या चक्रीवादळाची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग देखील प्रचंड राहणार आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती?
हवामान विभागाकडून कोकणातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील काही तासांमध्ये या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच दिवसभर उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता आहे. तसेच दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये मात्र कोरडं हवामान राहणार आहे. मराठवाड्यात देखील कोरडंच हवामान राहण्याची शक्यता आहे.