ग्रामपंचायत बिनविरोध काढणाऱ्या गावांना लाखोंचा निधी, शिवसेना-भाजपमध्ये अनोखी स्पर्धा

| Updated on: Jan 15, 2021 | 7:57 PM

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध काढल्यास 60 लाखांचा निधी जाहीर केला आहे. (Shivsena VS BJP Osmanabad Gram Panchayat Election 2020)

ग्रामपंचायत बिनविरोध काढणाऱ्या गावांना लाखोंचा निधी, शिवसेना-भाजपमध्ये अनोखी स्पर्धा
Shivsena Bjp
Follow us on

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात 428 ग्रामपंचायत निवडणुकीचा आखाडा पेटला आहे. ग्रामपंचायत बिनविरोध काढणाऱ्या गावांना निधी रुपी बक्षीस देण्याची स्पर्धा सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी असलेल्या भाजपच्या लोकप्रतिनिधींमध्ये लागली आहे. शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी बिनविरोध ग्रामपंचायतला 25 लाख निधीची घोषणा केली आहे. तर भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध काढल्यास 60 लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे. (Shivsena VS BJP Osmanabad Gram Panchayat Election 2020)

आमदार विकास निधी बरोबरच जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद आणि इतर शासकीय योजनांसह आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जवळपास 9 सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतींना 25 लाख, 11-15 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतींना 40 लाख, तर 17 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतींना 60 लाख विकास निधी प्राधान्याने उपलब्ध करून देण्याचा निर्णय आमदार पाटील यांनी जाहीर केला आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी या गावातील रस्ते आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पण अद्याप प्रशासनातील अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी यांनी भेट देऊन कोणतेही आश्वासन दिलेले नाही. त्यामुळे हा बहिष्काराचा निर्णय कायम आहे. या गावात 17 सदस्यांसाठी निवडणूक होत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील 428 ग्रामपंचायतमधील 1 हजार 377 प्रभागात 3 हजार 653 सदस्यांच्या निवडीसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी 9 हजार 997 नामांकन अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 151 अर्ज अवैध ठरल्याने 9 हजार 796 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उद्या ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. तर ग्रामपंचायत बिनविरोध आणि अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी सुरु आहे. (Shivsena VS BJP Osmanabad Gram Panchayat Election 2020)

संबंधित बातम्या : 

ग्रामस्थांसमोर लोटांगण घालणारे बगाटे पोहोचले थेट पोलिसांत; शिर्डीत ग्रामस्थ आणि साई संस्थानचा वाद चव्हाट्यावर

भिवंडीत ग्रामपंचायत निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार दीपक म्हात्रे यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार