Video : वसईत नायजेरियन नागरिकाचे अपहरण आणि हत्या, आरोपींना मेघालयमधून अटक

| Updated on: May 08, 2022 | 8:13 PM

मयत व्यक्तीचे 3 मे रोजी त्याच्या नालासोपारा येथील राहत्या घरातून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 4 मे रोजी नायगावमध्ये एका फ्लॅटमध्ये त्याचा मृतदेह आढळला. याप्रकरणी वालीव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत व्यक्ती नग्नावस्थेत फ्लॅटमधील बाथरुममध्ये आढळला. त्याला जबर मारहाण करण्यात आली होती. यामुळे त्याचा मृत्यू झाला.

Video : वसईत नायजेरियन नागरिकाचे अपहरण आणि हत्या, आरोपींना मेघालयमधून अटक
वसईत नायजेरियन नागरिकाचे अपहरण आणि हत्या
Image Credit source: TV9
Follow us on

वसई : एका नायजेरियन नागरिकाचा खून करून, बांगलादेश बॉर्डर मार्गे भारत देशातून पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या 6 नायजेरियन आरोपींना 24 तासात पकडण्यात यश आले आहे. महाराष्ट्र व मेघालय पोलिसांनी ही संयुक्त कारवाई (Joint Action) केली आहे. मेघालय राज्यातील शिलॉंग येथून वसईच्या वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने 6 ही आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी सर्व आरोपींना शनिवारी शिलॉंगच्या स्थानिक न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना 7 दिवसांची ट्रान्झिट रिमांड (Transit Remand) घेऊन वसईला घेऊन येत आहेत. मयत व्यक्ती हा नायजेरियन कम्युनिटीमध्ये एका पदावर होता. यामध्ये मयताने कम्युनिटीमध्ये काही आर्थिक अफरातफर केल्याचा आरोपींना संशय होता. याच संशयातून या व्यक्तीची झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र आरोपींचा जबाब नोंदवल्यानंतरच सत्य समोर येईल. (Kidnapping and murder of a Nigerian national in Vasai, accused arrested from Meghalaya)

अपहरण करुन हत्या करण्यात आली

मयत व्यक्तीचे 3 मे रोजी त्याच्या नालासोपारा येथील राहत्या घरातून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 4 मे रोजी नायगावमध्ये एका फ्लॅटमध्ये त्याचा मृतदेह आढळला. याप्रकरणी वालीव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत व्यक्ती नग्नावस्थेत फ्लॅटमधील बाथरुममध्ये आढळला. त्याला जबर मारहाण करण्यात आली होती. यामुळे त्याचा मृत्यू झाला. यावेळी या फ्लॅचमध्ये राहणारे 3 नायजेरियन घर सोडून गेल्याचे पोलिसांना कळले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांना मयताच्या घराजवळचा एक सीसीटीव्ही हाती लागला. या सीसीटीव्हीमध्ये सहा नायजेरियन इसम मयताला जबरदस्तीने घरातून बाहेर काढत मारहाण करीत चारचाकी गाडीतून घेऊन जात असल्याचे दिसले.

महाराष्ट्र पोलिस आणि मेघालय पोलिसांची संयुक्त कारवाई

पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला असता आरोपी बंगलोरला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांची एक टीम बंगलोरला रवाना झाली. मात्र तेथे गेल्यावर सर्व आरोपी विमानाने गुवाहाटीला गेल्याचे कळले. आरोपी देश सोडून जाऊ नये म्हणून तात्काळ लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली. आरोपी गुवाहाटी-चेरापुंजी-शिलाँग-डावकी मार्गे बांग्लादेश येथे पळून जाण्याच्या मार्गावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मेघालय पोलिसांना याची माहिती देत आरोपींचे फोटो आणि पासपोर्ट नंबर देण्यात आले. त्यानंतर मेघालय पोलिसांनीही तात्काळ पावले उचलत सहा आरोपींना 6 मे रोजी ताब्यात घेत महत्वपूर्ण कामगिरी केली. महाराष्ट्र पोलिस आणि मेघालय पोलिसांनी केलेल्या संयुक्तिक कारवाईमुळे सहा ही आरोपींना 24 तासांच्या आत अटक करण्यात आले.

मीरा-भाईंदर वसई विरारचे पोलिस आयुक्त सदानंद दाते, अप्पर पोलिस आयुक्त श्रीकांत पाठक, वसई परिमंडळ 2 चे पोलिस उपायुक्त संजयकुमार पाटील, तुळिंज विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास बर्वे, पोलिस निरीक्षक गुन्हे राहुलकुमार पाटील, सपोनि संतोष सांगवीकर, गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि ज्ञानेश फडतरे, पोलिस हवालदार मनोज मोरे, पोलिस हवालदार मुकेश पवार, पोलिस हवालदार किरण म्हात्रे, पोलिस नाईक सचिन दोरकर, पोलिस नाईक राजेंद्र फड, पोलिस नाईक गांगुर्डे, पोलिस अंमलदार गरीबे, मुंडे आणि खताळ तसेच वालीव पोलिस ठाण्यातील इतर अधिकारी व अंमलदार यांनी केली. (Kidnapping and murder of a Nigerian national in Vasai, accused arrested from Meghalaya)