‘नवीन मित्र आला म्हणून जुन्या मित्राला…’, रामदास आठवले यांचा महायुतीला टोला

| Updated on: Mar 18, 2024 | 7:07 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागावाटपावर प्रतिक्रिया देताना महत्त्वाचं वक्तव्य केलेलं. महायुतीमधील सर्व पक्षांना सन्मानजनक जागा दिल्या जातील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत रामदास आठवले यांनी मोठी मागणी केली आहे.

नवीन मित्र आला म्हणून जुन्या मित्राला..., रामदास आठवले यांचा महायुतीला टोला
Follow us on

सांगली | 18 मार्च 2024 : आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यातील महायुती सरकारला चिमटा काढला आहे. आरपीआय महायुती सोबतच असून नवीन मित्र आला म्हणून जुन्या मित्राला विसरू नका, असा टोला रामदास आठवले यांनी लगावला. आरपीआय ही महायुतीत आहे, असं ते रामदास आठवले म्हणाले. तसेच आरपीआयचा महायुती सरकारने योग्य सन्मान राखावा, अशी मागणीही त्यांनी पुन्हा एकदा या निमित्ताने केली. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीत शिर्डी आणि सोलापूर या दोन जागांची मागणी महायुतीकडे केली आहे. त्यामुळे आरपीआयसाठी दोन जागा सोडाव्यात आणि आरपीआयचा सन्मान राखावा, अशी भूमिका रामदास आठवले यांनी मांडली.

“वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात असल्याचं सातत्याने सांगत आहेत. ते जरी मोदींच्या विरोधात असले तरी मी मोदींच्या सोबत आहे”, असं रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं. “प्रकाश आंबेडकर हे महाआघाडीसोबत जातील असं वाटत नाही”, असंही रामदास आठवले म्हणाले. दरम्यान, कर्नाटमधील भाजपा खासदार अनंत हेगडे यांनी केलेल्या वक्तव्याचा आठवले यांनी निषेध केला. तसेच हेगडे यांच्यावर कारवाईची मागणी भाजपा नेत्यांकडे केल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं.

महायुतीच्या जागावाटपाचा तिढा उद्या सुटणार?

महायुतीच्या जागावाटपाकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जागावाटपासाठी हालचाली सुरु आहेत. पण अद्यापही जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब झालेलं बघायला मिळत नाही. असं असताना भाजपकडून महाराष्ट्रात उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहेत.

भाजप 30 पेक्षा जास्त जागांवर उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला किती जागा मिळणार याबाबत सस्पेन्स आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीच्या जागावाटपासाठी दिल्लीत उद्या महत्त्वाची खलबतं होणार आहे. महायुतीचे प्रमुख नेते उद्या दिल्लीत बैठकीसाठी जाणार आहेत. या बैठकीत जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे