मोठी बातमी! मजामस्तीमध्ये पोलीस निरीक्षकाकडूनच पोलीस ठाण्यात गोळीबार, नाशिक हादरलं
नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मजामस्तीमध्ये पोलीस निरीक्षकाकडूनच पोलीस ठाण्यात गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मजामस्तीमध्ये पोलीस निरीक्षकाकडूनच पोलीस ठाण्यात गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये असलेल्या एका पोलीस ठाण्यात ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे शासकीय पिस्तुलातूनच हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या घटनेसंदर्भात माहिती देण्यास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून नकार देण्यात आला आहे. परंतु दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या संदर्भात ट्विट करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले अंबादास दानवे?
‘खाकीची मग्रुरी आणि मजामस्ती! नाशिकमध्ये पोलीस ठाण्यासारख्या संवेदनशील ठिकाणी एका पोलीस निरीक्षकाने केवळ ‘मजामस्ती’ म्हणून शासकीय पिस्तुलातून गोळीबार करावा, म्हणजे मनमौजी कारभाराचा नमुना आहे. सामान्य नागरिकांना सुरक्षेचे धडे देणारेच आता कायद्याची ऐशीतैशी करत आहेत. सर्वात संशयास्पद आणि संतापजनक बाब म्हणजे, आठवडा उलटूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी साधलेले मौन! यावर नासिक पोलिस आणि गृह विभाग बोलणार का? १. CCTV फुटेज गायब करण्याचा आणि ‘डेली डायरी’मध्ये नोंद न करता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे का? २. नियम धुडकावून गोळीबार करणाऱ्या आपल्या लाडक्या अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी ही सुंदोपसुंदी सुरू आहे का? ३. स्वतःच्याच माजलेल्या अधिकाऱ्यावर कारवाईचे धाडस दाखवणार की ‘खाकी-खाकी भाई भाई’ म्हणत विषय मिटवणार? गृह विभाग आणि सरकारने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला हवी.’ असं ट्विट अंबादास दानवे यांनी केलं आहे.
काय आहे प्रकरण?
समोर आलेल्या माहितीनुसार नाशिक आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये असलेल्या एका पोलीस ठाण्यात ही घटना घडली आहे. पोलीस निरीक्षकाने मजामस्तीमध्ये थेट पोलीस ठाण्यातच शासकीय पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना घडल्याचं बोललं जात आहे. मात्र या घटनेसंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यास नकार देण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.