राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता गुन्हेगारी मोडीत काढा; अजितदादांकडून पोलिसांना ढील

| Updated on: Feb 05, 2021 | 3:46 PM

कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता पोलिसांनी गुन्हेगारी मोडीत काढावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना दिले आहेत.

राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता गुन्हेगारी मोडीत काढा; अजितदादांकडून पोलिसांना ढील
Follow us on

पुणे : कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी करताना नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन पोलिसांनी सामान्य नागरिकांना सेवा द्यावी. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता पोलिसांनी गुन्हेगारी मोडीत काढावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. (Police should Bring crime under control without bowing to political interference : Ajit Pawar)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज ‘सेवा’ उपक्रम, ‘एक्स ट्रॅकर’ उपक्रमाचा शुभारंभ आणि विविध सोशल मिडीया पेजेस लोकार्पण करण्यात आले. तसेच स्मार्ट आयएसओ पोलीस ठाणे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार दिलीप मोहिते-पाटील, आमदार अण्णा बनसोडे, पिंपरी-चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये सुसंवाद असणे आवश्यक आहे. पोलिसांकडून उत्कृष्ट सेवेची अपेक्षा करीत असताना त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याची आपली जबाबदारी आहे. नागरिकांना सुरक्षितता वाटावी म्हणून राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता पोलिसांनी गुन्हेगारी मोडीत काढत, गुन्हेगारांना धडा शिकवला पाहिजे, असे सांगून राज्य शासन कायम आपल्यासोबत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

समाजमाध्यम (सोशल मीडिया) हे जगभरात जनसंवादाचे प्रभावी माध्यम आहे. समाज माध्यमे वापरत असताना काळजी घेतली पाहिजे. नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण होणार नाही याबाबत काळजी घेत समाजात अचूक माहिती प्रसारित केली पाहिजे. या कामासाठी जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूक करण्याच्या सूचना देत समाज माध्यमाचा जनहितासाठी पुरेपूर वापर झाला पाहिजे. नागरिकांना उत्तम सेवा देत असताना चांगले उपक्रम राबविले जावेत. नागरिक विश्वासाने पोलिसांकडे येत असतात, त्यांच्या प्रश्नांची उकल करत त्यांचे समाधान झाले पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांच्या मनात भिती असते त्यांना सुरक्षितता वाटावी अशाप्रकारची सेवा पोलिसांनी दिली पाहिजे. स्कॉटलँड पोलिसांनंतर आपल्या पोलिस दलाचे नाव घेतले जाते याचा सार्थ अभिमान आहे. राज्यात लवकरच पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सेवा उपक्रम, एक्स ट्रॅकर उपक्रमांच्या माध्यमातून चागंली सेवा नागरिकांना मिळावी, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

‘सोशल एन्जल’ या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल महासेतुचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार गौरीधर, ग्रायफॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शशी भट, एमआयटी विद्यालयाचे प्राचार्य किशोर रवांडे, एक्स ट्रॅकरचे प्रकल्प अधिकारी समाधान महाजन तसेच आयएसओ प्रमाणित पोलिस स्थानकांच्या वरिष्ठ निरीक्षक यांचा यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांची बदली करवीर, कोल्हापूर येथे झाल्याने त्यांचा सत्कारही अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

हेही वाचा

म्हशीवर करणी केल्याचा समज, बीडमध्ये चिमुकल्याची हत्या, भावकीतील दाम्पत्य अटकेत

पंढरपुरात चोरीला गेलेले मोबाईल कर्नाटकात ट्रेस, अल्पवयीन चोरट्याकडे घबाड सापडलं

(Police should Bring crime under control without bowing to political interference : Ajit Pawar)