एकनाथ शिंदेंच्या टायगर भेटीने प्रदीप पूर्णेकरांचा मुलगा संतापला; ठाण्यातून केली मोठी घोषणा, कोणाची डोकेदुखी वाढणार?
एकनाथ शिंदेंच्या टायगर भेटीने प्रदीप पूर्णेकरांचा मुलगा संतापला आहे. त्यांनंतर राम पूर्णेकरांनी ठाण्यातून मोठी घोषणा केली आहे. त्यांनी दसऱ्यानंतर भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट केले.

अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी तातडीने त्याच्या घरी पोहोचून धीर दिला. एकनाथ शिंदेंनी श्रॉफ कुटुंबीयांना सुरक्षेच्या बाबतीत आश्वस्त केलं. परंतु एकनाथ शिंदेंनी गोळीबारानंतर अवघ्या 20 मिनिटांत टायगर श्रॉफच्या तब्येतीची विचारपूस केल्याने प्रदीप पूर्णेकरांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी संपात व्यक्त केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या घरापासून आमचं घर हे 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. तरी देखील त्यांनी आम्हाला घरी येऊन न्यायासाठी आश्वस्त केलं नाही. आम्हाला न्याय हवा आहे, असं म्हणत राम पूर्णेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर उपोषण करणार असल्याची घोषणा केली.
राम पूर्णेकर म्हणाले, ‘ टायगर श्रॉफवर गोळीबार झाला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित पहिली प्रतिक्रिया दिली नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील काही बोलल्या नाहीत. परंतु एकनाथ शिंदे यांनी त्वरित प्रतिक्रिया दिली. माझे वडील देखील शिवसैनिक होते. त्यांच्या निधनानंतर कोणीच काही बोललं नाही. आम्ही प्रयत्न करत होतो. प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाल्याचे सांगितले. सर्व झाल्यानंतर तुम्ही कॉल केला. टेन्शन वगैरे घेऊ नका, असं सांगण्यात आलं. परंतु याने काय होतं? आता पप्या शिंदेची कोठडी संपली. त्यानंतर राजा शिंदेंना चौकशीला बोलावलं. यात दोघे आरोपी आहेत. बबलू आणि टल्ली. त्यांची कोठडी संपल्यानंतर मिनाक्षी शिंदेंना बोलावणार आहात का? आम्हाला दिसत आहे की, आमच्या मोबाइलमध्ये पुरावे आहेत. तरी त्यांना अटक केली जात नाही. एका शिवसैनिकाला न्याय देऊ शकत नाही. बॉलिवूड स्टारसाठी रात्रीच पथक तयार करत आहेत. तो फक्त जखमी आहे. माझ्या वडिलांचा जीव घेतला. आम्हाला भावना नाहीत का?’.
‘एकनाथ शिंदे हे त्यादिवशी उद्धव ठाकरेंवर बोलले. ते राजकारण करण्यासाठी आल्याचे बोलले. परंतु ठाकरेसाहेब हे 11 वाजता येणार असल्याचं कळालं. त्यानंतर साडेबारा वाजेपर्यंत आले. एवढा मोठा माणूस माझ्या घरी आला. एकनाथ शिंदे यांच्या घरापासून माझं घर 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यांनी घरी येऊन न्याय मिळेल, असं आश्वासन द्यायचं होतं. मी दसरा झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर आंदोलन करणार आहे. मी त्यांच्या घराच्या बाहेर साखळी उपोषणाला बसेन. जिथे शक्य आहे, तिथे उपोषणावर बसेल. दोन आरोपी मोकाट फिरत आहेत. त्यांना अटक करण्यासाठी उपोषण करेल. ठाण्यासहित महाराष्ट्राची जनता पाहत आहे. त्या दोघांना अटक होत नाही, आम्हाला न्याय मिळणार कसा? दोघे सामील आहेत, तरी त्यांना कोणी काही करत नाही. माझी आई देखील लाडकी बहीण आहे. माझ्या आईला विधवा केलं, असा संताप पूर्णेकरांनी व्यक्त केला.