बारामती हादरली! उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला; तातडीने रुग्णालयात दाखल

पुण्यातील उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर बारामती येथे हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हल्ल्यानंतर राणा सूर्यवंशी यांच्यावर बारामतीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बारामती हादरली! उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला; तातडीने रुग्णालयात दाखल
Rana Suryavanshi Baramati News
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 18, 2026 | 9:45 PM

एकीकडे मुंबईमध्ये अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाला आहे. तर दुसरीकडे पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकावरही हल्ला झाल्याची घटना समोल आली आहे. बारामती विमानतळ परिसरात राणा शिपिंग कंपनीचे मालक राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. सायंकाळीसाडेसातच्या सुमारास घडलेल्या या घटनेत त्यांच्या हाताला मोठा मार लागला आहे. जखमी सूर्यवंशी यांना तातडीने बारामतीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राणा सूर्यवंशी विमानतळ परिसरात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. पुष्पगुच्छ देण्याच्या बहाण्याने हल्लेखोर त्यांच्याजवळ आले. त्यानंतर अचानक जवळून गोळीबार करून त्यांनी घटनास्थळावरून पळ काढल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर सूर्यवंशी यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागील कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Loading...

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. हा हल्ला व्यावसायिक वादातून झाला की त्यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

या घटनेनंतर राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. “राणा शिपींग कंपनीचे मालक राणा सूर्यवंशी यांच्यावर बारामती एअरपोर्टच्या परिसरात गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त अतिशय धक्कादायक आहे. सुदैवाने ते यातून बचावले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
राज्यातील कायदा सुव्यवस्थेची कशी दुर्दशा झाली आहे हे दर्शविणारे हे वृत्त आहे. गुन्हेगार सहजासहजी गोळीबार करुन निघून जातात आणि गृहखात्याची यंत्रणा काहीच करु शकत नाही. लोक दहशतीखाली असून गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले आहे का अशी स्थिती आहे.
गृहखात्याने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन हल्लेखोरांना अटक करावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करावी”, असं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us