पुणे महापालिकेतील नोकरभरती घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अखेर जेरबंद; राजेंद्र खेडेकरला 5 दिवसांची पोलीस कोठडी!
पुणे महापालिकेतील बहुचर्चित बनावट नोकरभरती घोटाळ्यात शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेल्या राजेंद्र खेडेकरला पोलिसांनी अटक केली. महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून शेकडो युवकांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दोन महिन्यांपासून फरार असलेल्या खेडेकरला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

नेमकं काय घडलं होतं?
महापालिका प्रशासनाने केलेल्या प्राथमिक पडताळणीत बनावट नोकरभरतीचा प्रकार समोर आला होता. आरोपींकडून देण्यात आलेली नियुक्तीपत्रे बनावट असल्याचे तपासात स्पष्ट झाले. या नियुक्तीपत्रांवर महापालिकेचे चिन्ह आणि वॉटरमार्कचा बेकायदेशीर वापर करण्यात आला होता. तसेच महापालिकेचे उपायुक्त आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या व शिक्के वापरून तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. नोकरी मिळणार असल्याच्या आशेने तरुणांची या माध्यमातून फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी गेल्या दोन महिन्यांपासून आरोपीचा शोध सुरु होता. अखेर फरार मुख्य आरोपी राजेंद्र खेडेकरला अटक करण्यात यश मिळालं आहे.
एकूण किती गुन्हे?
या प्रकरणी डॉ. राजेंद्र खेडेकर आणि त्याच्या टोळीविरोधात पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये 3 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर मागील 2 महिन्यांपासून पोलीस आरोपींच्या शोधात होते. मात्र, आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर शिवाजीनगर पोलिसांना आरोपीबाबत गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि डॉ. राजेंद्र खेडेकर याला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू करण्यात आला आहे.
उद्देशाचा कसून तपास
बनावट नियुक्तीपत्रे तयार करण्यामागे नेमका उद्देश काय होता, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपींच्या माध्यमातून आणखी तरुणांची फसवणूक झाली आहे का, याचीही माहिती पोलीस घेत आहेत. पुढील तपासातून या प्रकरणातील आणखी बाबी समोर येण्याची शक्यता आहे.