हडपसर ते फुगेवाडी… विषारी दारुचे मोठे कांड, 8 जणांच्या मृत्यूमागील कारण काय?

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसराला विषारी दारूच्या घटनेने हादरवले आहे. फुगेवाडी भागात केमिकलयुक्त स्पिरिटमुळे ५ जणांचा मृत्यू झाला असून मुख्य आरोपी योगेश वानखेडेला अटक करण्यात आली आहे. वाचा सविस्तर वृत्त.

हडपसर ते फुगेवाडी... विषारी दारुचे मोठे कांड, 8 जणांच्या मृत्यूमागील कारण काय?
liquor
| Updated on: May 29, 2026 | 9:12 AM

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसराला विषारी दारूच्या भीषण घटनेने हादरवून सोडले आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील फुगेवाडी भागात गेल्या ४८ तासांत झालेल्या ८ मृत्यूंपैकी ५ जणांचा बळी हा विषारी दारूमुळेच गेल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने तातडीने कारवाई करत विषारी दारू तयार करण्यासाठी केमिकलयुक्त स्पिरिट पुरवणाऱ्या मुख्य आरोपी योगेश वानखेडे याला अटक केली आहे. मृत्यूचे सत्र सुरू होताच वानखेडे स्वतः पोलिसांत हजर झाला, त्यानंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश वानखेडे यानेच पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी आणि पुण्याच्या हडपसर भागात केमिकलयुक्त स्पिरिट पोहोचवले होते. या स्पिरिटपासून बनवलेली घातक हातभट्टीची दारू प्यायल्याने ५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर आणखी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

फुगेवाडी येथील आझाद चौकातील शोककुळाच्या फलकावर एकाच वेळी गावातील ८ जणांच्या निधनाची माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी स्पष्ट केले की, या ८ मृतांपैकी ५ जणांचा मृत्यू हा विषारी दारूच्या सेवनाने झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, तर उर्वरित ३ जणांचा मृत्यू हा हृदयविकाराचा झटका आणि नैसर्गिक कारणांमुळे झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र यांच्या शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.

मृतांची नावे

१) पाडुरंग फुगे

२) विजय प्रकाश राठोड

३) राजेंद्र प्रकाश राठोड

४) राजू राजपूत

५) अकबर पठाण

६) बाबा शेख

७) आनंद देसाई

८) आनंद निकाळजे

दोघांची प्रकृती चिंताजनक
१) सुभाष डिगीकर – मेडी पॉईंट हॉस्पिटल

२) अक्षय अवसरमल – यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपास सुरु

दरम्यान सध्या या प्रकरणाचा तपास दापोडी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग करत आहेत. मुख्य आरोपी योगेश वानखेडेला अटक करण्यात आली असून ५ जणांचा मृत्यू विषारी दारूमुळे झाल्याचा संशय आहे. मात्र, सर्व मृतदेहांचा शवविच्छेदन (Post-Mortem) अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कायदेशीर व अचूक कारण स्पष्ट होईल, असे दापोडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us