ओट्यावर झोपलेल्या शेतकऱ्याचा घरात घुसून गेम वाजवला, 36 तासांत आरोपी पोलिसांच्या तावडीत, थरारक सत्य समोर

शिरूर तालुक्यातील वरूडे गावात शेतकरी बाळासो तांबे यांचा ओट्यावर झोपलेले असताना कोयत्याने गळा चिरून खून करण्यात आला. शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या ३६ तासांत जुन्या वादातून खून करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे.

ओट्यावर झोपलेल्या शेतकऱ्याचा घरात घुसून गेम वाजवला, 36 तासांत आरोपी पोलिसांच्या तावडीत, थरारक सत्य समोर
crime
| Updated on: Jun 11, 2026 | 8:54 AM

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. शिरुर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेरील ओट्यावर गाढ झोपेत असलेल्या एका शेतकऱ्याचा कोयत्याने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला. बाळासो बबन तांबे (४५) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या रक्ताळलेल्या घटनेमुळे संपूर्ण शिरूर तालुक्यात आणि वरूडे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. मात्र, शिक्रापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अत्यंत कौशल्याने तपास करत अवघ्या ३६ तासांच्या आत या गुन्ह्याचा छडा लावला आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. जुन्या वादाचा राग मनात धरून हा रक्तरंजित सूड उगवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

वरूडे येथील रहिवासी असलेले बाळासो तांबे हे नेहमीप्रमाणे रात्री जेवण करून आपल्या घराबाहेरील ओट्यावर झोपण्यासाठी गेले. रात्रीच्या अंधाराचा आणि शांततेचा फायदा घेत अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर धारदार कोयत्याने गळ्यावर सपासप वार केले. हे वार इतके भीषण होते की, बाळासो यांना प्रतिकार करण्याची किंवा मदतीसाठी ओरडण्याचीही संधी मिळाली नाही. अतिरक्तस्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस येताच गावात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर कुटुंबाने एकच आक्रोश केला.

पोलिसांकडून जलद कारवाई

या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गावात कोणतीही संशयास्पद हालचाल झाली होती का, याचा शोध घेण्यासाठी तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय करण्यात आले. यावेळी संशयाची सुई गावातीलच एका अल्पवयीन मुलाभोवती फिरल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली.

दोन वर्षांपूर्वीच्या भांडणाचा वचपा

या तरुणाला पोलिसी खाक्या दाखवताच संशयित अल्पवयीन मुलाने गुन्ह्याची कबुली दिली. दोन वर्षांपूर्वी मृत बाळासो तांबे आणि या मुलामध्ये काही कारणावरून कडाक्याचे भांडण झाले होते. तसेच, नुकताच त्यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला होता. याच जुन्या भांडणाचा आणि अपमानाचा राग या अल्पवयीन मुलाच्या मनात धुमसत होता. याच रागातून आणि सूडाच्या भावनेतून त्याने बाळासो यांचा काटा काढण्याचे ठरवले. रात्री सर्वजण झोपेत असताना त्याने थेट घरात घुसून ओट्यावर झोपलेल्या बाळासो यांच्यावर कोयत्याने वार केले.

गुन्हा करण्यासाठी वापरलेला कोयता जप्त

पोलिसांनी आरोपीकडून खुनासाठी वापरलेला धारदार कोयता आणि गुन्ह्याच्या वेळी परिधान केलेले कपडे जप्त केले आहेत. या प्रकरणाचा अवघ्या ३६ तासांत छडा लावल्याबद्दल पुणे ग्रामीण पोलिसांचे आणि शिक्रापूर पोलीस पथकाचे कौतुक होत आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने पुन्हा एकदा अल्पवयीन मुलांमधील वाढती गुन्हेगारी आणि हिंसक प्रवृत्तीचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.

Follow Us