ASF : पशुसंवर्धन विभागाचा महाराष्ट्राला ‘अलर्ट’! डुकरांमधल्या अत्यंत घातक अन् संसर्गजन्य आजाराचा धोका वाढला

ASF मानवांमध्ये संक्रमित किंवा पसरत नाही. परंतु ते डुकरांमध्ये प्राणघातक आणि अत्यंत संसर्गजन्य (Infectious) आहे. सध्या बिनदिक्कतपणे डुकरांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे ASF पसरण्याचा धोकाही वाढला आहे. यावर नियंत्रण गरजेचे असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे.

ASF : पशुसंवर्धन विभागाचा महाराष्ट्राला अलर्ट! डुकरांमधल्या अत्यंत घातक अन् संसर्गजन्य आजाराचा धोका वाढला
संग्रहित छायाचित्र
Image Credit source: HT
| Updated on: Jul 21, 2022 | 7:57 PM

पुणे : बिहार, उत्तर प्रदेश त्याचप्रमाणे ईशान्येकडील काही राज्यांमध्ये डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाइन फिव्हर (ASF)चा प्रादुर्भाव झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. डुक्कर (Pig), डुकराचे मांस, यासंबंधित उत्पादने त्याचबरोबर डुकराच्या मलमूत्रासह डुकराचे खत राज्यातील आणि बाहेरच्या अनधिकृत वाहतुकीवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्याचे निर्देश पशुसंवर्धन विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यात अशा हालचालींवर कोणतेही निर्बंध नसल्याचे समोर आले आहे. डुकरांचा अचानक मृत्यू झाल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरीत कळवावेस असे आवाहन विभागाने डुक्कर पाळणाऱ्यांना केले आहे. ASF मानवांमध्ये संक्रमित किंवा पसरत नाही. परंतु ते डुकरांमध्ये प्राणघातक आणि अत्यंत संसर्गजन्य (Infectious) आहे. सध्या बिनदिक्कतपणे डुकरांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे ASF पसरण्याचा धोकाही वाढला आहे. यावर नियंत्रण गरजेचे असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे.

कडक तपासणी करण्याचे आदेश

राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे संचालक धनंजय परकाळे याविषयी म्हणाले, की आतापर्यंत राज्यात किंवा शेजारच्या राज्यांमध्ये एएसएफची एकही केस नोंदवली गेली नाही. मात्र खबरदारीचा इशारा दिला आहे. डुक्कराशी संबंधित कोणतेही उत्पादन असो किंवा डुकरे असो. याची अनधिकृत वाहतूक थांबविणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने चेकपॉइंट्सवर कडक तपासणी करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

बिनदिक्कतपणे सुरू आहे डुकरांची वाहतूक

केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एएसएफबाबत कोणी माहिती दिली तर रोगाचा केंद्रबिंदू असलेल्या 1-किलोमीटर क्षेत्रातील डुकरांना मारले जावे, असा नियम आहे. महाराष्ट्रात जवळपास 1.61 लाख डुकरांची संख्या आहे. इतर राज्यांना डुक्कर आणि डुकराचे मांस आणि डुकराची उत्पादने यांचा पुरवठा करणाऱ्यांपैकी एक आहोत. त्यामुळे या जुकरांचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे परकळे म्हणाले. तुलनेने जास्त मांस खाणारे केरळसारखे राज्य जे इतर राज्यांमधून डुकराचे उत्पादन आणते. मात्र त्या तुलनेत महाराष्ट्र डुकराच्या मांसामध्ये स्वयंपूर्ण आहे, असे संबंधित विभागाने सांगितले आहे.