अजित पवारांच्या सभेआधीच मोठा राडा, सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी

| Updated on: Nov 03, 2022 | 4:49 PM

पुण्यात अजित पवार यांच्या सभेआधी सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

अजित पवारांच्या सभेआधीच मोठा राडा, सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी
विरोधी पक्षनेते अजित पवार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे : पुण्याच्या शिरुर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. शिरुर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकारण चांगलंच पेटलं आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीनिमित्त विरोधी पक्षनेते अजित पवार यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आलीय. पण या सभेआधीच मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवारांच्या सभास्थळी लावण्यात आलेल्या बॅनवरुन मोठा वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.

खरंतर अजित पवारांच्या उपस्थितीत शिरुर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाराची सभा सुरू होणार होती. पण ही सभा सुरू होण्याअगोदरच सत्ताधारी आणि विरोधी गटात तणाव निर्माण झाला.

पाच हजार मयत सभासदांच्या वारसांना सभासद का करून घेतले नाही? याचा जाब विचारणारा फ्लेक्स विरोधकांनी सभास्थळी लावला आणि त्यावरुनच वाद उफाळला. या वादाची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.

हे सुद्धा वाचा

घोडगंगा सहकारी साखर कारखान्यात गेल्या पाच वर्षांपासून शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांची एकहाती सत्ता होती. पण आता त्यांच्या एकहाती सत्तेला शह देण्यासाठी विरोधकांकडून विशेषत: भाजपकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडताना दिसत आहे. म्हणून तालुक्यातील वातावरण तापलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग

दरम्यान, आगामी महापालिका, त्यानंतर येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात घडामोडींना वेग आल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली होती. आगामी महापालिका निवडणुकीसाठी रणनीती त्या बैठकीत आखण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. विशेष म्हणजे अजित पवार विधी मंडळाच्या अधिवेशनानंतर पुणे जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचीदेखील चर्चा आहे. पण याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.