मित्रासोबत गच्चीवर झोपायला गेला, गाढ झोपत असताना मित्राने जे केलं… पुण्यात खळबळ

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात गोणवडी येथील आयटीआयच्या विद्यार्थ्याचा त्याच्याच वर्गमित्राने चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मित्रासोबत गच्चीवर झोपायला गेला, गाढ झोपत असताना मित्राने जे केलं... पुण्यात खळबळ
pune ambegaon
| Updated on: Jun 05, 2026 | 2:27 PM

महाराष्ट्रातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. पुण्यातील आंबेगाव तालुक्यामधील गोणवडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या एका २३ वर्षीय विद्यार्थ्याचा त्याच्याच वर्गमित्राने चाकूने भोसकून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या क्रूर घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात आणि संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. घोडेगाव पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला आहे.

टेरेसवर झोपलेला असताना हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ संतोष साखरे (२३) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यातील चिंचपूर या ठिकाणी राहत होता. सौरभ हा गोणवडी येथील आयटीआय कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. सौरभ आणि त्याच्याच वर्गात शिकणारा एक विद्यार्थी नेहमीप्रमाणे रात्री इमारतीच्या टेरेसवर झोपण्यासाठी गेले होते. दोघेही गाढ झोपेत असताना मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी विद्यार्थ्याने सौरभवर धारदार चाकूने सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, गंभीर जखमी झालेला सौरभ रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर तिथेच त्याचा मृत्यू झाला.

संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात; कारणाचा शोध सुरू

या घटनेची माहिती मिळताच घोडेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी विद्यार्थ्याला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. आरोपी विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, त्यांच्यात काही जुना वाद होता का, की इतर काही कारणावरून त्याने हा हल्ला केला, याची चौकशी सध्या घोडेगाव पोलीस करत आहेत. मात्र या धक्कादायक प्रकारामुळे पुणे हादरले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us