मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीसाठी तातडीचा जीआर आला, तब्बल 3000 कोटींचा निधी मंजूर; कोणाला होणार फायदा?
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ता योजनेअंतर्गत ३ हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी आता मंजुरी देण्यात आली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ अंतर्गत शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी एकूण २०,५५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यापैकी शिल्लक राहिलेल्या ९,४५३ कोटी रुपयांमधून ३००० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. हा निधी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केला जाईल.
कर्जमाफीची प्रक्रिया कशी सुरू आहे?
कर्जमाफी योजना राबवताना सरकारकडून थेट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार नाहीत. त्यासाठी आधी कर्ज खात्यांची तपासणी केली जाणार आहे. बँकांकडून पात्र कर्ज खात्यांची माहिती घेतली जाईल. त्यानंतर शेतकऱ्यांची ओळख आधार क्रमांकाच्या माध्यमातून पडताळली जाईल. कर्ज खातं, पीक कर्जाची रक्कम आणि थकबाकी याची माहिती तपासली जाईल. या प्रक्रियेनंतर पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्या जातात. अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जातो. यापूर्वीच्या योजनांमध्ये आलेल्या अडचणी लक्षात घेऊन यावेळी सरकारकडून डिजिटल पडताळणीवर भर दिला गेला आहे.
पात्र शेतकरी कसे ठरवले जातात?
दरम्यान, कर्जमाफीचा लाभ प्रत्येक कर्जदाराला आपोआप मिळणार नाही. शासनाने निश्चित केलेल्या नियमांनुसार पात्रता ठरवली जाणार आहे. त्यासाठी कर्जाचा प्रकार, कर्जाची रक्कम, कर्ज खाते आणि कर्ज घेतल्याचा कालावधी तपासला जाणार आहे. कर्ज हे पात्र पीक कर्ज असणं आवश्यक आहे. शेतीशी संबंधित इतर कर्जांना योजनेचे नियम लागू होतीलच असं नाही.
योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांच्या 2 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्ज थकबाकीचा विचार केला जात आहे. तसेच शासनाने निश्चित केलेल्या कालावधीत घेतलेलं कर्ज पात्र ठरणं आवश्यक आहे. आधार व्हेरिफिकेशन आणि डिजिटल नोंदणी पूर्ण असणंही महत्त्वाचं ठरणारच आहे.
दरम्यान, राज्यामध्ये अनेक दिवसांपासून कर्जमाफीची मागणी समोर येत होती. सध्या राज्यात दुष्काळही जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे पात्र शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाल्याचं म्हटलं जातंय.