जळगावात गोरगरिबांना ‘स्नेहाची शिदोरी’, सणाच्या दिवशी आंब्याचा रस, शिरा आणि पुरणपोळी

| Updated on: Apr 17, 2021 | 7:37 PM

कोरोनाच्या साथीरोगात गोरगरिबांना मदत व्हावी म्हणून जळगावमध्ये जैन उद्योग समूहाने 'स्नेहाची शिदोरी' हा सामाजिक उपक्रम सुरू केला आहे.

जळगावात गोरगरिबांना स्नेहाची शिदोरी, सणाच्या दिवशी आंब्याचा रस, शिरा आणि पुरणपोळी
Follow us on

जळगाव : कोरोनाच्या साथीरोगात गोरगरिबांना मदत व्हावी म्हणून जळगावमध्ये जैन उद्योग समूहाने ‘स्नेहाची शिदोरी’ हा सामाजिक उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जळगावातील गोरगरीब नागरिकांना दोन वेळचे जेवण उपलब्ध करून दिले जात आहे. गेल्या वर्षभराच्या काळात स्नेहाच्या शिदोरीची 10 लाखांहून अधिक पाकिटे गरजूंना वाटप करण्यात आली असून लाखो लोकांनी त्याचा लाभ घेतला आहे. कोरोना महामारीच्या कठीण काळात गोरगरिबांसाठी हा उपक्रम संजीवनी ठरला आहे (Quality food for poor and needy people in Jalgaon amid Corona pandemic).

सकाळी आणि सायंकाळी सात्त्विक व रुचकर जेवणाच्या पाकिटांचे वाटप

नागरिकांना सकाळी आणि सायंकाळी सात्त्विक व रुचकर जेवणाच्या पाकिटांचे वाटप केले जाते. जैन हिल्स येथील स्वयंपाक घरात 40 पेक्षा अधिक कर्मचारी सकाळ व संध्याकाळ अशा दोन्ही वेळी जेवण बनवतात. त्यानंतर जेवणाची पाकिटे तयार करतात. ही पाकिटे वाहनातून शहरातील कांताई सभागृहात आणली जातात. तेथे गरजू नागरिकांना जेवणाच्या पाकिटांचे विनामूल्य वाटप केले जाते.

सणासुदीच्या दिवशी आंब्याचा रस, शिरा, पुरणपोळी असं गोडधोड जेवण

एका व्यक्तीला दिवसभरासाठी आवश्यक असलेले सकस अन्न स्नेहाच्या शिदोरीतून देण्यात येते. दररोज सकाळी वेगवेगळ्या प्रकारची भाजी, चटणी आणि चार पोळ्या तसेच सायंकाळी प्रत्येकी 400 ग्रॅम खिचडी असे जेवण दिले जाते. विशेष म्हणजे, सणासुदीच्या दिवशी आंब्याचा रस, शिरा, पुरणपोळी असे गोडधोड जेवण दिले जाते, जेवणाची चव, शुद्धता, वाटप प्रक्रियेतील टापटीपपणा यामुळे गरजू नागरिक आनंदाने जेवणाची पाकिटे नेऊन आपली भूक भागवतात.

दररोज हजारो नागरिक या उपक्रमाचा लाभ घेत आहेत. रोजच्या जेवणाची गुणवत्ता, त्याचे वेगळेपण, चव आणि पॅकिंग या प्रक्रियेवर जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांचे व्यक्तिश: लक्ष असते.

हेही वाचा :

जळगावात कोरोना रुग्णांचा उपचारातील दुर्लक्षाने मृत्यू, राज्यपालांना पत्र लिहित कुटुंबियांचे गंभीर आरोप

स्टेजवर गाता गाताच बोदडेंना पॅरेलिसिसचा अ‍ॅटॅक आला, ग्रामस्थांकडून पै पै जमा; वाचा, पुढे काय घडलं?

नागरिकांनी फेकून दिलेल्या मास्कचा चक्क गादी बनवण्यासाठी वापर, जळगावात धक्कादायक प्रकार उघड

व्हिडीओ पाहा :

Quality food for poor and needy people in Jalgaon amid Corona pandemic