जळगावात कोरोना रुग्णांचा उपचारातील दुर्लक्षाने मृत्यू, राज्यपालांना पत्र लिहित कुटुंबियांचे गंभीर आरोप

जळगावात कोरोना रुग्णांचा उपचारातील दुर्लक्षाने मृत्यू, राज्यपालांना पत्र लिहित कुटुंबियांचे गंभीर आरोप

जळगावमध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालयावर (GMC) एका कोरोना रुग्णाच्या उपचारांकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप झालाय.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Apr 07, 2021 | 4:17 AM

जळगाव : जळगावमध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालयावर (GMC) एका कोरोना रुग्णाच्या उपचारांकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप झालाय. प्रदीप पावरा असं या कोरोना रुग्णाचं नाव आहे. विशेष म्हणजे रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्याची पोलीस तक्रार मुलाने दिलीय. जळगावच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असताना गंभीर परिस्थिती असतानाही रुग्णालयाने दुर्लक्ष केल्याचा आरोप झालाय (Death of Tribal Corona patient in Jalgaon due to Medical negligence).

“प्रदीप पावरा यांची प्रकृती गंभीर असतानाही त्यांना रात्री उशीरा PNC वॉर्डमध्ये हलवण्यात आले. तेथे ते पलंगावरून खाली पडले आणि रात्री 5 तास ते बेडखाली पडलेले होते. तेव्हा त्यांना ऑक्सीजनही मिळाला नाही आणि तब्येत बिघडून ते बेशुद्ध झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू मेडिकल कॉलेजच्या निष्काळजीपणामुळे झालाय,” असा आरोप त्यांची पत्नी आणि मुलांनी केलाय. त्यांनी याबाबत जळगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल केला आहे. तसेच जोपर्यंत रुग्णालयाचं सीसीटीव्ही फुटेज मिळत नाही तोपर्यंत पावरा यांचा मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतलीय.

पावरा कुटुंबीयांचं न्यायासाठी राज्यपालांना पत्र

प्रदिप पावरा यांचा उपचारा दरम्यान झालेल्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या कुटुंबाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी आदिवासी असल्याने हेळसांड व दुर्लक्ष झाल्याचा आरोप केलाय. तसेच या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. मुलाने लिहिलेल्या या पत्रात म्हटलं आहे, “माझे वडील प्रदीप पावरा यांना 29 मार्च 2021 रोजी सकाळी श्वास घेण्यास त्रास होतत होता. त्यामुळे माझा भाऊ चोपडा तालुक्यातील लासुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेवून गेला. तिथे असलेल्या डॉक्टरांनी माझ्या वडिलांना ताबडतोब चोपडा येथे हलवण्यास सांगितले. मात्र वडिलांचा schwab चा रिपोर्टही आम्हाला दिला नाही. तसेच विनंती करूनही आम्हाला रुग्णवाहिका दिली नाही.”

दुचाकीवर वडिलांना मधे बसवत मागे आईला बसवसे आणि टिबलशिट 22 किमीचा प्रवास

“शेवटी माझा भावाने त्यांना दुचाकीवर वडिलांना मधे बसवत मागे आईला बसवसे आणि टिबलशिट 22 किमी अंतर कापत ग्रामीण रुग्णालय चोपडा येथे आणले. तेथील डॉक्टर मनोज पाटील यानी पेशंटचे कुठलेच रिपोर्ट नाहीत मात्र ऑक्सिजन लेव्हल 79 असल्याने ताबडतोब स्वॅब घेतला. प्राथमिक उपचार केला आणि पेशंट डायबेटिक असल्याने उपचारासाठी जळगाव येथे रेफर केले. ऑक्सिजन लावून रुग्णवाहिकेने जळगावला पाठवले. मात्र, जळगावला आमची संघटना लोक संघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी, जळगाव वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन यांना खूप विनंती केली की आमची आर्थिक परिस्थिती नसल्याने आपण GMC मधे भर्ती करून घ्यावे. मात्र, त्यांनी त्याबाबत असमर्थता दाखवली व कुठलीही मदत केली नाही,” असंही या पत्रात नमूद करण्यात आलंय.

खासगी रुग्णालयाचा खर्च पेलत नसल्याने सरकारी रुग्णालयात दाखल केलं

“प्रवासात रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन साठा संपत आल्याने मग नाईलाजाने आम्ही जळगाव येथील आरुषी या खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी उपचाराचे पैसे घेतले नाहीत. मात्र, मेडिकल बिलाचा खर्च आम्हाला पेलवत नसल्याने आम्ही पुन्हा आमच्या ओळखीच्या संघटनेच्या लोकांच्या मार्फत जिल्हाधिकारी तथा नवसंजीवनी कमेटीचे अध्यक्ष यांना विनंती केली आणि मग त्यांना GMC जळगाव येथे 30 मार्च रोजी रात्री भरती करण्यात आले. माझ्या वडिलांना जळगाव मेडिकल कॉलेज येथील वॉर्ड नंबर 14 या ICU वॉर्डमध्ये भरती केले. माझे वडील डायबेटिक असल्याने त्यांना ताबडतोब ऑक्सिजन व इतर उपचार सुरू करण्याची आम्ही विनंती केली.”

कुठून कुठून हे आदिवासी येतात अशी रुग्णाची हेटाळणी

“वडील 2 एप्रिलपर्यंत त्या वॉर्डमध्ये भरती होते तेव्हा त्यांनी आम्हाला बोलावून सांगितले की रूममधील वॉर्ड बॉय व डॉक्टर पाणी मागितले किंवा काही दाखवायला बोलावले की सारखे सांगतात तू आम्हाला बोलावले तर तू मेला तरी तुला पाणी देणार नाही. तुला बघायला येणार नाही. कुठून कुठून हे आदिवासी येतात आम्हाला त्रास द्यायला. याबाबत आम्ही GMC च्या डीन सरांकडे 2 एप्रिल रोजी तोंडी तक्रारही केली होती. WhatsApp द्वारे जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केली होती. माझ्या वडिलांना मी त्यामुळे 2 एप्रिलला नियमात नसताना पाणी दिले. त्याच दिवशी रात्री 9 वाजता मी वडिलांना बघून घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 मार्च रोजी हॉस्पिटलमध्ये गेलो तर तिथे वॉर्ड नंबर 14 मध्ये माझे वडील नव्हते.”

रुग्ण पलंगावरुन पडला तरी मदतीला कुणीही आलं नाही

“माझे वडील कुठे गेले हे विचारूनही मला कुणीही सांगत नव्हते. तेव्हा आमच्या संघटनेच्या लोकांनी कोविड बेड हेल्पलाईनला फोन करून विचारलं. त्यावर त्यांनी पेशंट PNC वॉर्डमध्ये शिफ्ट केल्याचं सांगितलं. मी धावत आईसोबत वॉर्डमध्ये पोहचलो, तर माझे वडील झटके मारत आणि जोरजोरात विव्हळत होते. आम्ही त्यांना धरून ठेवले आणि आमच्या संघटनेच्या प्रतिभा शिंदे यांना फोन केला. त्यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेत डीन डॉ. रामानंद यांना सोबत घेवून PNC वॉर्डमध्ये आल्या. तेव्हा शेजारच्या पेशंट यांनी सांगितले की हे पेशंट इथे आल्यानंतर पलंगावरून खाली पडले. खूप वेळ पडून होते आणि जोरात विव्हळत होते. मात्र, कोणीही न आल्याने आम्ही काही वेळाने हिम्मत करून यांना कॉटवर टाकले. तेव्हापासून पेशंट पूर्ण गंभीर अवस्थेत चालले गेले. GMC चे डीन यांनी पेशंटला पुन्हा 14 नंबर वॉर्डमध्ये शिफ्ट केले. मात्र, तेव्हापासून पेशंट पूर्ण बेशुद्ध झाले. त्यांचा त्याच अवस्थेत मृत्यू झाला.”

चौकशी करुन दोषींवर कारवाई करा

“आम्ही आदिवासी समाजाचे व पेसां भागातील गरीब असल्याने माझ्या वडिलांवर उपचारा दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रापासून तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार करताना प्रचंड हेळसांड झाली. अक्ष्यम असे दुर्लक्ष झाले व आम्हाला आणि पेशंटला जाणीवपूर्वक हिन वागणूक दिली. याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वॉर्ड नंबर 14 व PNC वॉर्डचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यावे. संबंधित कर्मचारी व डॉक्टर ज्यांनी उपचारादरम्यान जाणून बुजून दुर्लक्ष केले व आम्ही आदिवासी असल्याने हिन वागवले याची चौकशी करावी. तसेच दोषीवर तात्काळ अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत. आम्ही सर्व मुलं वडिलांवर अवलंबून होतो आणि शिक्षण घेत होतो. आम्हाला पोरके करणाऱ्या दोषींवर चौकशी करून तात्काळ कार्यवाही करावी.”

हेही वाचा :

Mumbai Corona Vaccine : मुंबईकरांच्या चिंतेत भर, 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच कोरोना लसीचा साठा!

Corona Update : 25 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची परवानगी द्या, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे विनंती

35 वर्षांखालील तरुणांचेही कोरोना लसीकरण करा, जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

व्हिडीओ पाहा :

Death of Tribal Corona patient in Jalgaon due to Medical negligence

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें