Raj Thackeray : पुढच्या 4-5 महिन्यात मोठी गडबड होणार…मोठ्या विधानानंतर राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधानांवर केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यानंतर त्यांनी सलग दोन दिवस भेटीगाठी घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

Raj Thackeray : पुढच्या 4-5 महिन्यात मोठी गडबड होणार...मोठ्या विधानानंतर राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
raj thackeray news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 23, 2026 | 10:28 AM

देशासहित राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यात पुढील 4 ते 5 महिन्यात देशात काहीतरी गडबड होणार असल्याचा दावा राज ठाकरेंनी केला आहे. त्यानंतर असा काळ येईल की, देशाला पंतप्रधान नसेल, असाही दावा राज ठाकरेंनी केला. त्यानंतर सलग दोन दिवस राज ठाकरेंनी बैठकांचा धडाका लावला आहे. राज ठाकरेंनी पंतप्रधानांवरील विधानानंतर सलग दोन दिवस बैठका घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे काही तरी मोठं घडणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

मनसेची बैठक 

Loading...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शुक्रवारी मनसे पदाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे.  राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सकाळी आज १० वाजता बैठक आयोजित केली आहे.  वांद्र्याच्या एम.आय.जी. क्लबमध्ये बैठकीचं आयोजन  केलं आहे. पुढील चार-पाच महिन्यांत मोठ्या घडामोडी घडतील, या राज ठाकरेंच्या विधानानंतर मनसेच्या बैठकीकडे लक्ष लागलं आहे. त्यात काही काळ देशात पंतप्रधानही नसतील, या राज ठाकरेंच्या विधानानंतर आज मनसेची खलबतं होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मनसेची आज महाराष्ट्रातील दुष्काळ स्थितीवर चर्चा होणार आहे. येणारा दिवाळी सण आणि महाराष्ट्रातील दुष्काळस्थिती याबाबत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना करणार आहेत. तसेच राज ठाकरे लवकरच महाराष्ट्रात दुष्काळ दौरा करण्याचीही शक्यता आहे.

काल दोन्ही ठाकरे बंधूंची भेट  

उद्धव ठाकरेंनी काल राज ठाकरेंची भेट घेतली. उद्धव ठाकरे हे गुरुवारी सहकुटुंब राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी दोन तास होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मातोश्रींच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झाले होते. ठाकरे कुटुंबातील या भेटीला कौटुंबिक जिव्हाळ्यासोबतच राजकीय महत्त्वही प्राप्त झाले होते.

बाळा नांदगावकर काय म्हणाले?

बाळा नांदगावकर म्हणाले, महाराष्ट्रात काय परिस्थिती याचा आढावा घेतलाय आहे. आज स्थिती काय आहे, याबाबत राज ठाकरे आढावा घेणार आहेत. पाणी टंचाई, पाऊस स्थिती, याचा आढावा घेत आहे. आढावा घेतल्यावर राज ठाकरे दौऱ्याबाबत निर्णय घेऊ शकतात. व्हीआयपी व्हिसीट झाल्यानंतर सरकारी यंत्रणा कामाला लागते.. ते पाहून निर्णय घेणार…अनेक वेळा आम्ही चार छावणी , अन्न पुरवठा अशी मदत मनसेने दिली आहे. आजही त्याच प्रकारे निर्णय साहेब घेऊ शकतात. मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपावर नांदगावकर म्हणाले, ‘जर ५०० कोटींचा आरोप खरा असेल तर भयंकर आहे.. राज्यासाठी ही चिंतेची बाब आहे. येणाऱ्या भविष्यासाठी हितकारक नाही.. राजकारणातील पिढी काय विचार करेल? राजकारण्यांकडे आदर्श म्हणून पहात होते आता काय विचार करेल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते की, देशातील निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजे. पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेशात बॅलेटवर पेपरवर निवडणुका घेतल्या जातात. ईव्हीएम जगाने नाकारलं आहे. मग भारतात का? फ्रान्समध्येही बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात आली आहे. आता पुढील 4-5 महिन्यात देशात मोठी गडबड होणार आहे, हे निश्चित आहे. देश रस्त्यावर आला तरी मला आश्चर्य वाटणार नाही. एक काळ असा राहील की, देशात पंतप्रधान नसेल, असेही ठाकरे म्हणाले होते.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us