अजितदादांच्या अपघाताला 4 महिने झाले तरी… रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल; म्हणाले आज अमित शाहांच्या बैठकीत तरी…
आमदार रोहित पवार यांनी अजितदादा पवार यांच्या अपघात प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. सीबीआय चौकशीचा शब्द देऊन अडीच महिने झाले तरी कारवाई का नाही, असा सवाल केला आहे.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी एका विमान अपघातात आकस्मिक निधन झाले. बारामती येथे सभेसाठी जात असताना अजित पवारांच्या विमानाचं लँडिंग होण्यापूर्वीच स्फोट झाला. यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळाले. अजित पवारांचे निधन होऊन ४ महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र अद्याप याप्रकरणी कोणतीही मोठी कारवाई झालेली नाही. आता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.
रोहित पवार यांनी नुकतंच त्यांच्या ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रोहित पवारांनी अजित पवार यांच्या अपघात प्रकरणावरुन थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. अजितदादांच्या अपघाताला उद्या ४ महिने होतील, पण मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात दिलेला शब्द अजूनही पाळलेला नाही, असा थेट आरोप रोहित पवारांनी केला आहे. तसेच रोह पवारांनी सीआयडीच्या (CID) संथ कारभारावर तीव्र संताप व्यक्त करत उद्या सीआयडी कार्यालयावर धडक देणार असल्याचा इशाराही दिला आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
आदरणीय मुख्यमंत्री साहेब… अजितदादांच्या अपघाताला उद्या 4 महिने होतील. अधिवेशनात बोलताना तुम्ही गुन्हेगारांना पाताळातून शोधून काढण्याचा, CBI चौकशीबाबत अमित शहा साहेबांकडे पाठपुरावा करण्याचा तसंच कर्नाटकात नोंद झालेली झिरो FIR महाराष्ट्रात वर्ग करून घेण्याचा शब्द दिला होता. आपण शब्द देऊन अडीच महिने होत आले, या अडीच महिन्यात काय कार्यवाही झाली हे आपणच सांगावे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांसोबत गेल्या अडीच महिन्यात आपल्या असंख्य बैठका झाल्या असतील त्यामध्ये सीबीआय चौकशीचा मुद्दा आपण घेतला नसेल तर आज होणाऱ्या बैठकीत तरी हा मुद्दा आग्रहाने घ्यायला हवा. राष्ट्रवादीचे मंत्री उपस्थित असतील तर त्यांनी देखील पाठपुरावा करायला हवा. मित्र हयात असला किंवा नसला तरी मित्रासाठी मैत्री नेहमीच जिवंत असते, ही सर्वसामान्य जनतेची भावना असते, राजकीय लोकांसाठी ही भावना वेगळी आहे का ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
राहिला प्रश्न CID चौकशीचा तर CID काय करते नेमकं हेच कळत नाही. गेल्या 28 तारखेला CID कार्यालयात गेलो असता तपास अधिकारीच उपस्थित नव्हते, त्यांना mail करून अनेक नवे पुरावे दिले, पत्र स्वतः जाऊन दिले तरी त्यांचा काहीही प्रतिसाद नाही. अजितदादांच्या अपघात प्रकरणात सीआयडी करत असलेला तपास बघता, CID सारख्या कुचकामी यंत्रणा म्हणजे बिनकामाचे ओझेच म्हणावे लागेल. असो, उद्या सीआयडी ऑफिसची वेळ मागितली असून उद्या सकाळी 10.30 वाजता भेट देणार आहे. CID ऑफिसला कदाचित सनदशीर मार्गाची भाषा समजत नसेल तर वेगळ्या भाषेत सांगावे लागेल, असे रोहित पवार म्हणाले.
दरम्यान रोहित पवारांनी या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे. यात त्यांनी #JusticeforAjitDada आणि #AjitdadaPawar हे हॅशटॅग वापरले आहेत. रोहित पवारांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता या अपघात प्रकरणाचा तपास आणि त्यावरील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.