भोंदू खरात प्रकरणात चाकणकरांचा बळीचा बकरा, त्यांचं पद गेलं, पण इतरांचं… रोहित पवार यांचा पुन्हा हल्लाबोल; रोख राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याकडे
Rohit Pawar : राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना अशोक खरात प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यावर आता रोहित पवार यांनी भाष्य केले आहे.

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची संपूर्ण देशात चर्चा झाली होती. खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले होते, तसेच भोंदूगिरी करून कोट्यवधींची संपत्ती जमवलेली आहे. तसेच एका बँकेच्या घोटाळ्यातही त्याचे नाव समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सध्या तपासणी सुरू आहे. या प्रकणात अनेक राजकारणी नेत्यांची नावे समोर आली होती. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अशातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर भाष्य करत इतर अनेक नेत्यांचा सहभाग असल्याचे विधान केले आहे. रोहित पवार यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
रूपाली चाकणकरांचा बळी…
रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली, यावेळी अशोक खरात प्रकरणावर बोलताना त्यांनी, अशोक खरातसोबत गुवाहाटीला कामाख्या देवीला कोणकोण गेलं हे महत्वाचं आहे. खरात प्रकरणात चाकणकरांना बळीचा बकरा बनवण्यात आलं. महिला आयोगाचं आध्यक्षपद आणि राष्ट्रवादीतलं पद गेलं, मात्र त्यांच्यासोबत असलेल्यांची मात्र प्रगती झाली. एका व्यक्तीची पदे गेली, तर दुसऱ्याची पदे वाढवली गेली, असं विधान केलं आहे.
सुनील तटकरेंवर टीका
आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना म्हटले की, ‘सुनील तटकरेंना बोलायचा अधिकार नाही. प्रचाराची गरज असताना अजित पवार एकटे फिरत होते. अजित पवारांच्या परिश्रमामुळे, भावनांमळे लोक निवडून आले. तुम्ही कष्ट घेतले असते तर घड्याळ पक्षाची कोकणात वाताहात झाली नसती. तुम्ही तुमचा परिवार वाढवायचं काम केलं.’
खरातची चौकशी सुरू
दरम्यान, अशोक खरातची एसआयटीतर्फे वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये चौकशी सुरू आहे. खरातने भोंदूगिरीच्या नावाखाली अनेक लोकांना गंडवले आहे. तसेच काळ्या जादूच्या नावाखाली अनेकांकडून पैसे उकळले असल्याचे समोर आले आहे. त्याबरोबर आर्थिक गैरव्यवहारातही त्याचा संबंध आहे, त्यामुळे त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर खरातचे अनेक राजकारणी लोकांसोबत संबंध असल्याचेही समोर आले होते. आता आणखी कोण-कोणते नेत्यांची नावे यात समोर येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.